सांगली : अनेक भविष्यवेत्त्यांची निवडणूक निकालाबाबची भाकितं चुकली, पण भाजप नेत्यांनी निकालाबाबत व्यक्त केलेला अंदाज खरा ठरतो. कारण निकाल काय असेल, याचं टेक्निक भाजप नेत्यांकडे आहे, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला.


अनेक भविष्यवेत्त्यांची निवडणूक निकालाबाबची भाकितं चुकली, पण भाजप नेते, त्यातल्या त्यात चंद्रकांत पाटील निवडणूक निकालाबाबत जे बोलत आले आहेत, ते तंतोतंत खरं ठरतं. याचा अर्थ ज्योतिषाच्या निकालावरचं भविष्य खरं ठरत नाही, पण भाजप नेत्यांनी व्यक्त केलेला अंदाज खरा ठरतो, कारण निकाल काय असेल, याचं टेक्निक भाजप नेत्यांकडे आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली. सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते.

ईव्हीएमच्या संशयावरुन आता सर्व विरोधीपक्ष आवाज उठवत आहेत, मात्र निवडणूक आयोगाकडून या पक्षांना आमच्या आरोपाबाबत ठोस उत्तर मिळत नाही. त्यामुळे भविष्यात ईव्हीएमवरुन जनआंदोलन उभारले जाऊ शकते, असा आशावादही शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केला.

साखर कारखानदारी नको, या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्यावरुनही राजू शेट्टींनी केंद्र सरकारवर टीका केली. साखर उद्योग अडचणीत येण्यास केंद्र सरकारच जबाबदार आहे. कच्ची साखर परदेशातून येऊ द्यायला नको होती, जर परदेशातील साखर आली नसती तर भारतातील साखरेला दर मिळाले असते आणि साखर उद्योग स्थिर राहिला असता असे राजू शेट्टी म्हणाले.