बीड : राफेल विमान खरेदीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठराखण केली नसल्याचे स्पष्टीकरण देत राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या विधानावरुन यूटर्न घेतला आहे. तसेच, राफेल विमानाच्या खरेदीच्या किंमतींसंदर्भात विरोधकांची जेपीसीची मागणी पंतप्रधानांनी मान्य करावी, अशी मागणीही शरद पवारांनी केली. ते राष्ट्रवादीच्या बीडमधील मेळाव्यात बोलत होते.
“आम्ही सत्तेत असताना राफेल घेण्याचा निर्णय झाला, पण किंमत ठरली नव्हती. आमच्या काळात एका राफेलची किंमत साडे सहाशे कोटी होती, ती मोदींनी 1660 कोटी केली. मी त्यांचे समर्थन केले नाही, माझे म्हणणं आहे राफेलची किंमत कशी वाढली, याचं स्पष्टीकरण संसदेत द्यावं.”, अशी मागणी शरद पवारांनी केली.
“जोवर माझ्याकडे पुरावे नाहीत, तोवर मी कुणावर आरोप करणार नाही. मात्र, राफेलबाबतची माहिती गुप्त ठेवायला पाहिजे, असे तुम्ही म्हणता, मग तांत्रिक माहिती देऊ नका. पण किंमतीची माहिती द्या.”, अशी मागणीही पवारांनी केली.
“आज सत्तेत असलेल्यांनी बोफोर्सच्या वेळी चौकशी मागणी केली. आज मात्र राफेलची चौकशी केली असता सरळ सरळ राफेल प्रकरणात लूट झाल्याचे चित्र दिसते आणि सरकार यात उत्तर देत नाहीत, तर आरोप होत राहणारच. पंतप्रधानांनी संसदीय कमिटी नेमण्याची मागणी मान्य केली पाहिजे.”, असे शरद पवार म्हणाले.
राफेल विमानाच्या खरेदी प्रकरणात पंतप्रधानांची पाठराखण केल्याची भूमिका पवारांनी मागच्या आठवड्यात मांडली होती. याच भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते खासदार तारिक अन्वर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. मात्र, आज बीडमध्ये विजय संकल्प मेळाव्यात बोलताना लाखो लोकांसमोर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
राफेल प्रकरणी मोदींची पाठराखण नाही, शरद पवारांचा यूटर्न
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Oct 2018 05:16 PM (IST)
“जोवर माझ्याकडे पुरावे नाहीत, तोवर मी कुणावर आरोप करणार नाही. मात्र, राफेलबाबतची माहिती गुप्त ठेवायला पाहिजे, असे तुम्ही म्हणता, मग तांत्रिक माहिती देऊ नका. पण किंमतीची माहिती द्या.”
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -