रायगड : नेरळ ते माथेरान अशी टॉय ट्रेन येत्या जून महिन्यात पुन्हा ट्रॅकवर धावणार आहे. नेरळ ते माथेरान या मार्गावर संरक्षक कुंपण लावण्यात येणार असून ट्रॅक बदलण्याचं कामही एक एप्रिलपासून सुरु होणार आहे.


खरं तर पावसाळ्याच्या चार महिन्यात टॉय ट्रेन बंद राहते. घसरण्याच्या भीतीमुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा मार्ग बंद राहतो. परंतु अमन लॉज ते माथेरान हा भाग यावेळी पावसाळ्यात कार्यरत राहिल, तर नेरळ ते अमन लॉज मार्ग बंद असेल.

हे काम पूर्ण होण्यास साधारण दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचं मध्य रेल्वेनं सांगितलं आहे. यासाठी साधारण 20 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यात टॉय ट्रेनच्या ट्रॅकला तडे गेले होते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव टॉय ट्रेनसेवा बंद करण्यात आली होती. मुख्यत्वे वळणांवर टॉय ट्रेनला अडचणींचा सामना करावा लागतो. या मार्गावर संरक्षक कुंपण लावून ट्रॅक बदलण्यात आले आहेत.

टॉय ट्रेनला एअर ब्रेक्स लावण्यात आले आहेत. तसंच सर्व कोचेसही बदलण्यात आले आहेत. त्यामुळे नेरळ ते माथेरान हा प्रवास आरामदायी आणि जलद होणार आहे.