जळगाव : नेपाळ दुर्घटनेत महाराष्ट्रातील 30 जणांचा मृ्त्यू झाला असून काहीजण जखमी आहेत. जखमींवर अद्यापही नेपाळमधील रुग्णालयात उपचार सुरू असून दैव बलवत्तर म्हणूनच आपला जीव वाचल्याची भावना या महाभयंकर अपघातातून बचावलेल्या सीमा इंगळे यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच, बस दुर्घटनेचा थरारक अनुभवही त्यांनी सांगितला. या दुर्घटनेनंतर नेपाळचं सैन्यदल आपल्या मदतीसाठी कशाप्रकारे धावलं आणि त्यांच्या सतर्कतेमुळे अनेक प्रवाशांचा जीव वाचला आहे. ही बस दुर्घटना नेमकं कशाने घडली, याचीही माहिती बसमधील प्रवासी सीमा इंगळे यांनी दिली. बसचे ब्रेक फेल झाल्याने आमच्या बसचा अपघात झाल्याचे सीमा इंगळे यांनी सांगितले. जळगावहून 80 भाविक धार्मिक पर्यटनासाठी निघाले होते, अयोध्या दर्शन करुन ते नेपाळच्या पशूपतीनाथांच्या दर्शनाला जात असताना त्यांच्या बसचा भीषण अपघात झाला.
नेपाळ बस दुर्घटना (Nepal bus accident) मधे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील 30 जणांचा बुडून मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर जखमींवर नेपाळमधील काठमांडू शहरात असलेल्या त्रिभुवन रुग्णलयात उपचार सुरू असून अनेकांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याची माहिती आहे. मात्र, अद्यापही काही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची तेथील माहिती आहे. या घटनेत बालंबाल बचावलेल्या तलवेल गावच्या सीमा इंगळे यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी घटनेचा थरारक अनुभव सांगितला. आमच्या बसचे ब्रेक फेल झाल्याने बस नदीत कोसळली, त्यांनतर नेपाळ देशाच्या सैन्याने (army) आम्हाला नदीतून बाहेर काढल्याने बसमधील आम्ही काही प्रवासी बचावलो, असे सीमा इंगळे यांनी म्हटले. नेपाळ बस दुर्घटनेनंतर नेपाळचं सैन्यच त्यांच्यासाठी देवदूत बनून धावल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. मात्र, दुर्दैवाने या दुर्घटनेत जळगाव (Jalgaon) जिल्यातील 30 जणांचा मृत्यू झाला असून एक अख्ख कुटुंबच या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलं आहे. तर, काहींनी आई-वडिलांसह जवळचे नातेवाईक गमावले आहेत.
दोनपैकी एक बस नदीत कोसळली
अयोध्या दर्शन घेण्याबरोबर नेपाळमधील पशूपती नाथांच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी वरणगाव येथील जवळपास 80 जण दोन बसच्या माध्यमातून नेपाळकडे निघाले होते. अयोध्या येथील श्रीराम मंदिर दर्शन झाल्यानंतर नेपाळमध्ये जात असताना काठमांडू जिल्ह्यात पोखरा पॉइंटवरून बस जात होती. एक बस सुरळीतरित्या पुढे निघाली, मात्र दुसऱ्या बस चालकाचे नियत्रंण सुटून थेट नदीत कोसळली. त्यामुळे बसमधील 27 जणांना जलसमाधी मिळाली. त्यामध्ये आपल्या नातेवाईकांसोबत गेलेल्या अंकित जावळे यांच्या मातोश्री नीलिमा जावळे यांचाही समावेश होता. मात्र, बसचे ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे आता प्रवासी सीमा इंगळे यांनी सांगितलं आहे.
नेपाळ बस अपघातात आईचा मृत्यू
अंकित जावळे हा लहान असतानाच आजारपणामुळे त्याचे पितृछत्र हरपले होते. आजी आजोबा आणि आई नीलिमा जावळे यांच्यासोबत राहत असताना कोरोना काळात त्याने आपल्या आजी आजोबांना ही गमावले. या धक्क्यातून सावरत नाही तो त्याचा एकमेव आधार असलेल्या आईचाही आता नेपाळ बस अपघातात मृत्यू झाला आहे. अंकित जावळे हा घरात एकटाच पडला आहे. आता एकट्याने जगायचे कसे? असा प्रश्न त्याच्या पुढे पडला आहे.
हेही वाचा
तुम्हाला इथे काय झक मारायला ठेवलंय का? अजित पवारांनी सर्वांदेखत अधिकाऱ्याला झापलं