चंद्रपूर : काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी तस्करांसोबत जोडलेले माझे संबंध म्हणजे राजकीय हिनता आहे. इतक्या खालच्या स्तराला जाऊन तथ्यहीन आरोप मी आजवर राजकीय आयुष्यात बघितले नाही. सत्याचा निर्घृण खून निरुपम यांनी केला आहे. त्यामुळं त्यांच्यावर चंद्रपूर जिल्ह्यात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, अशी प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. अवनी वाघिणीच्या मृत्यूसंदर्भात निरुपम यांनी मुनगंटीवार यांच्यावर आज जे गंभीर आरोप केले, ते मुनगंटीवार यांनी फेटाळून लावले.

मुनगंटीवारांना वाघ मारण्यातच जास्त रस असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला होता. सरकारने अवनी वाघिणीला मारण्यासाठी पाच कोटी खर्च केले. मुनगंटीवार वनमंत्री झाल्यापासून वाघ मारण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मुनगंटीवारांना वाघ मारण्यातच जास्त रस असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला. अवनी वाघिणीच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या ग्लोबल मार्च काढण्यात येणार असल्याची घोषणा संजय निरुपम यांनी केली आहे. हा ग्लोबल मार्च मुंबईतील वरळी सीफेस ते शिवाजी पार्क असा काढण्यात येणार आहे.

अवनीला ज्या पद्धतीने मारलं, त्याचं समर्थन केलं जात आहे, पुरावे नष्ट केले जात आहेत, त्यामुळे मंत्र्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अवनीची हत्या झाल्यावर एक दिवसाने ओदिशामध्ये एका वाघाला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यात आलं. पाच कोटी रुपये खर्च करुन राज्य सरकारने कुख्यात शूटरला आणून अवनीला मारलं, असंही निरुपम म्हणाले.

2008 ते 2015 दरम्यान महाराष्ट्रात फक्त 14 वाघ मारले गेले. 2016 या एका वर्षात 16 वाघ मारले गेले, तर एकट्या 2017 मध्ये 21 वाघ मारले गेले.  मुनगंटीवार वनमंत्री झाल्यावर वाघ मारण्याची संख्या वाढली. मुनगंटीवर यांचं वर्तन पाहून त्यांना जनावरांना मारण्यात रस आहे, असं वाटतं, असा घणाघातही निरुपम यांनी केला. ते मंत्री झाल्यापासून वाघांचा जीव जातोय. त्यांना मंत्रिमंडळापासून दूर ठेवायला पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी निरुपम यांनी केली आहे.