मुंबई : देशभरात आज वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘नीट’ परीक्षा घेतली जात आहे. परीक्षेसाठी यंदा 13.36 लाख विद्यार्थी बसत असून ड्रेसकोडचा नवा नियम यावेळी लागू होत आहे.


वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या (एमबीबीएस आणि बीडीएस) प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या ‘नीट’ परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन लाखांनी अधिक आहे.

यावर्षी बीड, बुलडाणा, लातूर, जळगाव, सोलापूर, मुंबई उपनगर या शहरात पहिल्यांदा नीट परीक्षा घेतली जात आहे. 'नीट'ची केंद्र वाढवल्यामुळे परीक्षार्थींची धावपळ कमी होणार आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) ही परीक्षा देशभरातील 150 शहरांमध्ये घेतली जात आहे. देशात सरकारी आणि खासगी महाविद्यालयांमध्ये मिळून पदवी अभ्यासक्रमाच्या 60 हजार जागा आहेत. या जागांच्या तुलनेत 20 पट अधिक विद्यार्थी ‘नीट’ परीक्षा देणार असल्याने यंदा प्रवेशांमधील स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे.

परीक्षेला जाण्यापूर्वी ही काळजी घ्या

नीट परीक्षा आज सकाळी 10 ते 1 या वेळेत होणार आहे. त्यासाठी 7.30 ते 9.30 या वेळेत परीक्षार्थींना केंद्रावर हजर राहायचं आहे. तीन टप्प्यात तपासणीनंतर त्यांना केंद्रात प्रवेश मिळणार आहे.

यामध्ये विद्यार्थ्यांनी हॉलतिकीट आणि पासपोर्ट साईज फोटोशिवाय परीक्षा केंद्रावर काहीही घेऊन जाऊ नये.

परीक्षेच्या दिवशी परीक्षार्थींसाठी ड्रेसकोड

परीक्षेच्या दिवशी हाफ स्लीव्हचे फिकट रंगाचे कपडे घालून या

कपड्यांवर कोणत्याही प्रकारची बटणं लावलेली नसावीत. शिवाय मुलींनी एम्ब्रॉयडरी असलेले ड्रेसही परिधान करुन नयेत.

परीक्षेच्या दिवशी शूज घालून येऊ नका. स्लिपर्स किंवा कमी उंचीच्या सँडल्स चालतील.

बुरखा, पगडी परिधान करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्याच्या एक तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचायला हवं.

विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची स्टेशनरी किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस घेऊन येऊ नये.

परीक्षा केंद्रावर दागिने, हॅण्डबॅग, पाण्याची बाटलीही घेऊन येऊ नये