मुंबई : राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री बसणार, असं भाजप नेते निवडणुकीपूर्वी म्हणायचे. परंतु विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर भाजपने त्यांचा पवित्रा बदलला असल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री हा महायुतीचाच होणार, असं वक्तव्य वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

शिवसेनादेखील आता मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच भाजपसोबत महायुतीत मुख्यमंत्रीपद मिळाले नाही तर आमच्याकडे अन्य पर्याय आहेत, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. याबाबत बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, शेर कितना भी भूखा हो, लेकीन वो घास नहीं खाता. असे बोलत मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाणार नाहीत, असे सूचवले आहे. मुख्यमंत्रीपद शिवसेनेला हवं आहे. परंतु त्यासाठी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

मुनगंटीवार म्हणाले की, आम्ही निवडणूक महायुतीत एकत्र लढलो, त्यामुळे दुसरा पर्याय कसा असू शकतो? ज्यांचं बोधचिन्ह वाघ आहे, ते काँग्रेसच्या हाताशी हातमिळवणी कशी करतील? जो कोणी मुख्यमंत्री असेल, तो पाच वर्षांसाठी महायुतीचाच असेल. तो कोणत्याही पक्षाचा नव्हे तर महायुतीचा असेल. नोव्हेंबरमध्ये त्याचा शपथविधी होईल.

युतीच्या संबंधांवर सुधीर मुनगंटीवार यांनी गाण्यातून मार्मिक भावना व्यक्त केली आहे. मुनगंटीवार म्हणाले की, "तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अंजाना, मैंने नही जाना, तूने नही जाना" युतीचं काय होणार? असा प्रश्न अनेकांना पडला असला तरी, परंतु काळजीचं कारण नाही. अनेक आव्हानात्मक प्रसंग आतापर्यंत आले. परंतु आमचं गोत्र एक आहे. 'भारतमाता' हे आमचं गोत्र आहे. उद्धवजी एक सह्रदयी नेते आहेत, आम्ही आणि ते मिळून सर्व काही मार्गी लावू.

मुख्यमंत्रीपदाबाबतचे प्रश्न चर्चेतून सुटतील. त्यासाठी स्वतः भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्धवजींशी चर्चा करतील. उद्धवजींनी मागणी समोर ठेवली आहे. प्रस्ताव तर द्यावाच लागतो. तो त्यांनी दिला आहे.

पाहा काय म्हणाले मुनगंटीवार?