मुंबई : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 105 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या आहेत. कोणत्याही पक्षाला बहुमताचा आकडा (145) पार करता आलेला नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेना (महायुती) सत्ता स्थापन करण्याच्या तयारीला लागले आहेत.

यावेळी मंत्रीमंडळात शिवसेनेला किती आणि कोणती मंत्रीपदं मिळणार? हे जरी स्पष्ट झाले नसले तरी, मिळणारी मंत्रीपदं ही निवडून आलेल्या उमेदवारांनाच मिळावी, असा आग्रह शिवसेना आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केला आहे.

मागील मंत्रीमंडळात शिवसेनेने विधान परिषदेच्या आमदारांना झुकतं माप देत मंत्रीपदं दिली होती. फडणवीस सरकारमध्ये सुभाष देसाई (उद्योग मंत्री ), दिवाकर रावते (परिवहन मंत्री), रामदास कदम (पर्यावरण मंत्री), दीपक सावंत (सार्वजनिक आरोग्य मंत्री) हे विधान परिषद सदस्य मंत्री होते. त्यामुळे शिवसेनेचे अनेक आमदार नाराज होते.

मागील मंत्रीमंडळात शिवसेनेने निवडून आलेल्या आमदारांना डावलून विधान परिषदेतल्या पाच आमदारांना कॅबिनेट मंत्रीपद दिले होते. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी विधान परिषदेतले मंत्री बदला म्हणून मातोश्रीवर मोठं नाराजीनाट्य घडलं होतं. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी कशीबशी आमदारांची समजूत काढली होती.

यावेळी मात्र निवडून आलेल्या आमदारांनी सुरुवातीलाच मंत्रीपदासाठी तटबंदी बांधायला सुरुवात केली आहे. शिवसेना आमदारांच्या या पवित्र्यामुळे शिवसेनेत भाजपप्रमाणे बुजूर्ग नेत्यांसाठी मार्गदर्शक पद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.