NDA Meeting Delhi: देशभरातील विरोधी पक्षांनी आगामी लोकसभेसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केल्यानंतर भाजपला सुद्धा आता मित्रपक्षांची आठवण आली आहे. त्यामुळे नोव्हेंबर 2021 नंतर प्रथमच विरोधकांची एकीने भाजपला मित्र पक्षांना आठवण्याची वेळ आली आहे. मात्र, या बैठकीसाठी महाराष्ट्रातील जुन्या मित्र पक्षांचा विसर भाजपला पडला आहे का? अशी शंका उपस्थित झाली आहे. महाराष्ट्रातून केवळ बच्चू कडू यांच्या प्रहार तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाला बैठकीचे निमंत्रण असल्याची माहिती आहे. मात्र, एनडीएच्या बैठकीसाठी भाजपकडून बहुतांश जुन्या मित्रपक्षांना निमंत्रण देण्यात आले नसून त्यांना कात्रजचा घाट दाखवण्यात आला आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत दाखल


माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेसह, विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम, महादेव जानकर यांच्या रासप, रिपब्लिकन पार्टी ऑफ कवाडे गट या जुन्या मित्र पक्षांना बैठकीचे भाजपकडून निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे एनडीएमधील मित्र पक्षाचे अनेक नेते नाराज झाले आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रातून शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादीमधील फुटीर अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. तसेच तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री पलानीस्वामीही दाखल झाले आहेत. त्यामुळे नव्यांसाठी पायघड्या आणि जुन्यांसाठी कात्रजचा घाट आहे का? अशी चर्चा रंगली आहे. 


दरम्यान, दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत अनेक विद्यमान आणि नवे मित्रपक्ष उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट, सुहेलदेव भारतीय समाज पक्ष, हिंदुस्थानी अवाम मोर्चा (सेक्युलर), राष्ट्रीय लोक जनता दल (आरएलजेडी), अण्णाद्रमुक, पवन कल्याण यांची जनसेना सहभागी झाली होती. इतर अनेक मोठे पक्ष सहभागी होणार आहेत.


एनडीएच्या बैठकीपूर्वी भाजप नेत्यांची बैठक


दरम्यान, एनडीएच्या बैठकीपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीला संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अश्विनी वैष्णव आणि इतर नेते उपस्थित होते.


आगामी लोकसभेसाठी इंडिया विरुद्ध मोदी मुकाबला


दुसरीकडे, देशातील 26 विरोधी पक्षांची बैठक बंगळूरमध्ये पार पडली. या बैठकीत विरोधकांच्या बैठकीत महाआघाडीला इंडिया असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी लोकसभेसाठी इंडिया विरुद्ध मोदी असा मुकाबला असणार आहे. इंडिया आघाडीची पुढील बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीत विरोधकांचा चेहरा कोण असेल? यावर मंथन होणार आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या