कोल्हापूर : एनडी पाटील यांच्या जाण्याने कष्ठकरी आणि शेतकरी समाजाचं मोठं नुकसान झालं आहे, आयुष्यभर एका विचारधारेला जपत त्यांनी त्यासाठी झोकून देऊन काम केलं असं जेष्ठ नेते शरद पवार म्हणाले. राज्यातील तरुण पीढीने एनडी पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असंही ते म्हणाले. होय, आमच्यात मतभेद होते असं सांगताना एनडींच्या आठवणीने शरद पवारांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या

Continues below advertisement


एनडी पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी शरद पवार हे कोल्हापुरात गेले आहेत. त्यावेळी बोलताना त्यांनी या भावना व्यक्त केला. 


शरद पवार काय म्हणाले?


महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात कष्टकरी, शेतकरी या सगळ्यांच्या हितांचं जतन करणाऱ्या जुन्या पिढीच्या शिलेदाराला आपण मुकलो आहोत. एन डी पाटील यांची विचारधारा ही डावी होती आणि त्या विचारधारेच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी आपलं आयुष्य झोकून दिलं. व्यक्तीगत सुख दुख, घर दार याचा कधी विचार केला नाही. शैक्षणिक चळवळीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांचा विचार हा त्यांच्यादृष्टीने अंतिम होता. 


एका बाजूने डाव्या विचारांनी सामान्य माणसाच्या हिताचं रक्षण करण्याचा संघर्ष आणि दुसऱ्या बाजूने कर्मवीरांनी उपेक्षित समाजाच्या मुला बाळांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले, त्यामध्ये पूर्ण ताकतीने कर्मवीरांचे विचार पुढे नेण्यासाठी त्यांनी आयुष्य घालवलं. 


राजकारणामध्ये आम्ही दोघे वेगवेगळ्या दिशेने होतो. त्यांची विचारधारेशी ते प्रामाणिक होते, आम्ही गांधी नेहरुच्या विचारधारेने पुढे जाणारे लोक होतो. प्रसंगी मतभेद व्हायचे, पण त्या मतभेदाला मर्यादा होत्या. त्यांना एका विशिष्ट चौकटीच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही हे त्यांनी कटाक्षाने पाळलं. पण रयत शिक्षण संस्था म्हटल्यानंतर त्या संस्थेचा मी अध्यक्ष आणि ते चेअरमन, ते अनेकवर्ष चेअरमन, त्या काळात झोकून देऊन काम कसं करायचं, कर्मवीरांच्या विचाराने, शाहू फुल्यांच्या विचाराने काम केलं. संघर्षमय त्यांचं जीवन होतं. संघर्षात त्यांनी अपयश घेतलं नाही. दुर्दैवाने कदाचित वय जास्त झाल्यामुळे जो काही त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला, त्यावर त्यांनी दोन तीनवेळा मात केली. पण या शेवटच्या संघर्षामध्ये वाढत्या वयामुळे कदाचित यशस्वी होऊ शकले नाहीत. त्यामुळेच आज ते आपल्यामध्ये नाहीत. आम्हा सगळ्यांच्या दृष्टीने कौंटुबीक दु:ख तर आहेच. पण सामान्य माणसाच्या कष्टकऱ्यांच्या दृष्टीने त्यांचं जाणं हा आघात आहे. मला विश्वास आहे महाराष्ट्रातील नवी पिढी त्यांचा आदर्श नजरेसमोर ठेवेल, आणि सामान्यांच्या भल्यासाठी त्यांनी जो रस्ता दाखवला त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करेल, तीच खरी त्यांच्यासाठी श्रद्धांजली ठरेल.


एनडी पाटील यांची राजकीय कारकीर्द


1948 : शेतकरी कामगार पक्षात प्रवेश
1957 : मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस
1960-66,1970-76,1976-82 अशी 18 वर्षं महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य
1969- 1978, 1985 – 2010 : शे.का.प.चे सरचिटणीस
1978-1980 : सहकारमंत्री ,महाराष्ट्र राज्य
1985-1990 : महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )
1999-2002 : निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार
महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य आणि सीमा चळवळीचे प्रमुख नेते



एन. डी. पाटील यांना मिळालेले सन्मान /पुरस्कार


भाई माधवराव बागल पुरस्कार : 1994 
स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ, नांदेड : डी. लीट. पदवी, 1999
राष्ट्रीय बियाणे महामंडळ (अध्यक्षपद ) भारत सरकार : 1998 – 2000
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ : डी.लीट.पदवी, 2000
विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद : 2001
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर : डी. लीट. पदवी
शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार


महत्त्वाच्या बातम्या :