अहमदनगर : रविवारी, सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या प्रयत्नांनी साकारण्यात्य आलेल्या त्यांच्या वैद्यकिय महाविद्यालयाचा उदघाटन, लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी भाजपच्या बड्या नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या वास्तूचं उदघाटन करण्यात आलं. ज्यानंतर व्यासपीठावर आलेल्या भाजपच्या प्रत्येक नेत्यानं शिवसेना आणि महाविकासआघाडीवर निशाणा साधला. नारायण राणे, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर तोफ डागली.


भाजप शिवसेनेच्या वाटेवर चालली असती तर महाराष्ट्राच शिवसेना उरलीच नसती असं भुवया उंचावणारं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. शिवाय आम्ही दिलेली वचनं पाळतो असं म्हणत त्यांनी सत्तास्थापनेची बिघडलेली समीकरणं पुन्हा एकदा सर्वांसमोर मांडली. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. ज्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीही शाह आणि फडणवीसांना महाविकास आघाडी सरकारवर टीका केल्याबाबत प्रत्युत्तर केलं. अहमदनगरमध्ये ते बोलत होते.


शाहंना उत्तर देत रोहित पवार म्हणाले...


'मुळात शाहंचं वक्तव्य हे व्यक्तीगत होतं. महाविकासआघाडी सरकार भाजपमधील कोणालाही पचनी पडलं नाही. शिवाय मागील अनेक वर्षांपासून युतीत असतानाही भाजपनं विश्वासघात केल्याची भावना शिवसेनेत होती, असं ते म्हणाले.


...तर शिवसेना महाराष्ट्रात उरलीच नसती- अमित शाह


महाविकासआघाडी सरकार हे जनादेशाचा अनादर करुन प्रस्थापित करणाऱ्या शहांना उत्तर देत हे सरकार, महाविकासआघाडी ही लोकहितासाठी झाल्याचं आश्वासक वक्तव्य त्यांनी केलं. या एकंदर प्रकरणातून एक वेगळा संदेश देशांमध्ये गेला आणि देशातील भाजपच्या स्थानिक मित्र पक्षांनी भाजपबद्दल बोलताना आवाज वाढवला त्यामुळे शाह बोलले असतील, असं ते म्हणाले.


... फडणवीस भीतीनं बोलले असावेत


'महाविकासआघाडीचं सरकार जाईल असं पहिल्या दिवसापासून फडणवीस म्हणत होते मात्र अजूनही सरकार टीकून आहे. त्यामुळे दर तीन महिन्याला ते सरकार पडणार असं सांगतात, आपले आमदार जाऊ नये या भीतीने असं बोलले असावेत', असा टोला रोहित पवारांनी फडणवीसांना लगावला.