आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे भाजपच्या तर आमदार दिलीप सोपल हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याने अनुपस्थित राहिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. मागील विधानसभेत सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीने 4 जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी हणमंतराव डोळस यांचं निधन झालं आहे तर मोहोळचे आमदार रमेश कदम हे तुरुंगात आहेत. तर उरलेल्या राहिलेल्या दोन्ही आमदारांनी मुलाखतीकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. दोन्ही आमदारांच्या अनुपस्थितीचे नेमके कारण काय हे अधिकृतरित्या जरी कळालं नसलं तरी यामुळे चर्चा मात्र बऱ्याच रंगल्या आहेत.
नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात आले होते त्यावेळी आमदार बबनदादा शिंदे यांनी विमानतळावर जाऊन त्यांचं स्वागत केलं होतं. त्यांनी गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेटही घेतली होती. बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी सेनेचे उपजिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांची भेट घेऊन बंद दाराआड चर्चा केली होती. त्यामुळे या दोघांच्या पक्ष बदलांच्या चर्चाना अधिक उधाण आलं आहे.
आमदार दिलीप सोपल आणि बबन शिंदे हे दोघेही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. गेली अनेक वर्षे दोन्ही नेत्यांनी राजकीय क्षेत्रात आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. त्यामुळे अशा मातब्बर नेत्यांनी जर राष्ट्रवादीकडे पाठ फिरवली तर आयत्या वेळेस कोणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न पक्षसमोर उभं राहण्याची शक्यता आहे.