राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची पोलिसाला नोकरी घालवण्याची धमकी
एबीपी माझा वेब टीम | 04 Jun 2018 09:57 PM (IST)
पोलिसाला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत त्याला नोकरी घालवण्याची धमकी देण्यात आली. पोलिसांनी सात महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून त्यांना 15 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्याचा उन्माद समोर आला आहे. पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत त्याला नोकरी घालवण्याची धमकी देण्यात आली. पोलिसांनी सात महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून त्यांना 15 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रेखा फड यांच्या मार्गदर्शनाखाली सात महिला कार्यकर्त्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डिझेल, पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन करत होत्या. त्यावेळी हा प्रकार घडला. रेखा फड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच चूल पेटवण्याचा प्रयत्न केला. बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवलं. यावेळी पोलिसाला शिवीगाळ करुन, तू मला ओळखत नाहीस, तुझी नोकरी सांभाळ, मी तुझी नोकरी घालवून टाकेन, तू कोण मला अडवणारा? अशा शब्दात वर्तन करण्यात आलं. रेखा फड यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन नोकरी घालवण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यासह सात महिला कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं असता 15 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.