मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तम प्रशासक असून त्यांच्यापासून शिकण्यासारखं खूप काही आहे, त्यांनी गुजरात आणि देशासाठी केलेलं काम हे कौतुकास्पद असल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना एका क्रिकेटच्या सामन्यादरम्यान, प्रेक्षकांच्या गॅलरीत त्यांच्यासोबत पहिली भेट झाल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. तसेच पहिल्याच भेटीत मोदींनी आपल्याला नावानं ओळखल्याचीही आठवण त्यांनी सांगितली. 


मोदी व्हीआयपी रुम सोडून प्रेक्षकांच्या गॅलरीत 


खासदार सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या की, "मी पहिल्यांदा खासदार असताना गुजरातला गेले होते. संसदेतील अनेक खासदार गुजरातमध्ये क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी जाणार होते, त्यांच्यासोबत मीदेखील गेले. त्यावेळी सामाना पाहताना एका खासदार मित्राने आपण स्टॅंडमध्ये जाऊया आणि सामना पाहूया अशी विनंती केली. एसी रूम सोडून बाहेर प्रेक्षकांच्या गॅलरीत बसल्यावर तिथे काही गुजरात पोलिस आले. त्यांनी आम्हाला त्यावेळी त्या ठिकाणाहून हटकलं."


त्यावेळी आपण खासदार असल्याचं त्या पोलिसांना माहिती नव्हतं असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. आपल्याला का हटकलं जातंय असा प्रश्न विचारल्यानंतर त्या पोलिसांने सांगितलं की या ठिकाणी मुख्यमंत्री बसणार आहेत. पण सगळे व्हीआयपी दुसरीकडे बसले असताना अशा ठिकाणी कोणी मुख्यमंत्री बसतो का, प्रेक्षकांमध्ये मुख्यमंत्री कशाला येतील असा विचार सुप्रिया सुळेंच्या मनात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. 


आपल्याला या ठिकाणाहून हटकण्यासाठी पोलीस मुख्यमंत्र्यांचं नाव सांगत असल्याचा विचार सुप्रिया सुळे यांच्या मनात आला. त्यामुळे ज्यावेळी मुख्यमंत्री येतील त्यावेळी आम्ही या ठिकाणाहून उठू असं सुप्रिया सुळे यांनी त्या पोलिसांना सांगितलं. सुप्रिया सुळे यांच्या या उत्तरानंतर ते पोलिस निघून गेले. 


...आणि मोदी आले


त्यानंतर कुणाच्याही ध्यानीमनी नसताना त्यावेळचे गुजरातचे मुख्यमंत्री, सुप्रिया सुळे ज्या ठिकाणी बसल्या होत्या त्या प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये आले. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "नरेंद्र मोदी आले आणि त्यांनी आपल्याला ओळखलं. तू सुप्रिया ना? असा प्रश्न त्यांनी मला विचारला. त्यानंतर पुढचा अर्धा तास मोदीजी आमच्यासोबत बसले आणि आमच्याशी चर्चा केली."


नरेंद्र मोदी हे चांगले प्रशासक


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगले प्रशासक आहेत, त्यांनी गुजरातसाठी आणि देशासाठी केलेलं काम हे कौतुकास्पद असल्याचं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. पहिल्यांदा भेटल्यानंतर त्यांनी आपल्यासोबत अनेक योजनांवर गप्पा मारल्या, त्यांनी केलेल्या कामाची माहिती दिली. त्यानंतर ते जेव्हा पंतप्रधान झाले आणि दिल्लीला आले त्यावेळी दुसऱ्यांदा त्यांच्यासोबत भेट झाली असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 


नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीवेळी सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यासोबत दुसरा खासदार कोण होता याचा मात्र खुलासा केला नाही.


ही बातमी वाचा: 



  • सुप्रिया सुळे म्हणतात, 'मिर्झापूर प्रचंड आवडली अन् कालिनभैय्याला थेट फोनच लावला'; पंकज त्रिपाठी म्हणाला, 'मी बारामतीला...'