मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य महिला  अध्यक्षपदी रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांची निवड करण्यात आली आहे. विद्या चव्हाण यांच्या जागी रोहिणी खडसे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच बीड जिल्ह्यातील बबन गिते यांची राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार गटाकडून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. 


रोहिणी खडसे या एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत. रोहिणी खडसे सक्रिय समाजकार्यात सहभागी असून एकनाथ खडसेंच्या राजकीय वारसदार म्हणून ही त्यांच्याकडे पहिलं जातं. रोहिणी खडसे यांनी गेल्या विधानसभेची निवडणूक ही भाजपाकडून लढवली होती. पण त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. 


एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर रोहिणी खडसे या देखील राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झाल्या. त्यानतंर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर एकनाथ खडसे हे शरद पवार यांच्यासोबतच राहिले. आता रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचं शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आलं आहे. 


बबन गिते यांची उपाध्यक्षपदी निवड 


बीडमधील बबन गिते यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बबन गिते यांनी धनंजय मुंडे यांची साथ सोडून शरद पवार यांच्या उपस्थितीत बीडमध्ये पक्ष प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांना ही संधी देण्यात आल्याचं सांगितलं जातंय. बीड जिल्ह्यात बबन गिते विरुद्ध धनंजय मुंडे असा अंतर्गत वाद असून त्यामध्ये बबन गिते यांना बळ देण्याचा प्रयत्न केला गेल्याची चर्चा आहे. 


रोहिणी खडसे यांची थोडक्यात ओळख


1) माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या म्हणून ओळख.


2) 2019 मधील विधानसभेत अवघ्या 1800 मतांनी पराभव.


3) कोविड काळात राष्ट्रवादीत प्रवेश.


4) सलग सहा वर्ष जिल्हा बँक अध्यक्ष म्हणून कामगिरी, सध्या विद्यमान संचालक.


5) राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गावात घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न.


5) महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळाच्या उपाध्यक्ष म्हणून कामगिरी.


दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांकडून पक्षावर दावा करण्यात आला आहे. दोन्ही गटांकडून ही फुट नसल्याचं सांगितलं जात असलं तरीही कायदेशीर लढाईसाठी तयारी मात्र केली जात आहे. दोन्ही गटांकडून पदाधिकाऱ्यांची शपथपत्रं भरून घेण्याची मोहीम सुरू आहे. निवडणूक आयोगात हे शपथपत्र दाखल केले जाणार असल्याची शक्यता आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे  अजित पवार आणि त्यांच्यासोबत काही नेते हे भाजप-सेनेसोबत सत्तेत सामील झाले. त्यानंतर त्या गटाने सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. तर दुसरीकडे जयंत पाटील हेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्याचं शरद पवार गटाकडून स्पष्ट करण्यात आलं. आता शरद पवार गटाकडून रोहिणी खडसे यांची महिला राज्य अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर अजित पवार गट काय भूमिका घेतो हे पाहावं लागेल. 


ही बातमी वाचा: