मुंबई: अजित पवारांनी (Ajit Pawar) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीत (NCP Crisis) घमासान सुरू झाल्याचं चित्र आहे. शरद पवारांनी या बंडखोर नेत्यांना पाठिंबा नसल्याचं जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयातील बंडखोर नेत्यांच्या फोटोंना कार्यकर्त्यांनी काळ फासल्याची घटना घडली. कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) पोहोचले आणि त्यांनी या फोटोंवरील काळं पुसलं. या घटनेदरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यालयातील वातावरण मात्र चांगलंच तापल्याचं चित्र होतं. 


सुनिल तटकरे, छगन भुजबळांच्या फोटोला काळं फासलं


मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात जमलेले पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी सुनिल तटकरे आणि छगन भुजबळांच्या फोटोला काळं फासलं. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. 


कार्यकर्त्यांनी फोटोंना फासलेलं काळं जितेंद्र आव्हाडांनी पुसलं आणि ते फोटो पुन्हा भिंतीवर लावण्यात आले. या दरम्यान मात्र गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं चित्र होतं. 


शरद पवारांचा बंडखोरांना इशारा


दरम्यान शरद पवारांनी राष्ट्रवादीतील बंडावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांनी आपल्याशी कोणतीही चर्चा केली नसून हे बंडच असल्याचं त्यांनी सांगितलं. या नेत्यांनी पक्षादेश धुडकावून हे पाऊल उचललं आहे, राष्ट्रवादीचे बडे नेते जरी आपल्याला सोडून गेले असले तरी त्याची चिंता नाही असं ते म्हणाले. सोडून गेले याची चिंता नाही तर सोडून गेलेल्यांच्या राजकीय भविष्याची चिंता आहे असा एक प्रकारचा इशाराच त्यांनी बंड केलेल्या नेत्यांना दिला आहे. 


अजित पवार यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतलेले राष्ट्रवादीचे मंत्री 



  • अजित पवार 

  • छगन भुजबळ 

  • दिलीप वळसे पाटील

  • हसन मुश्रीफ

  • धनंजय मुंडे

  • आदिती तटकरे 

  • संजय बनसोडे

  • अनिल पाटील 

  • धर्मरावबाबा आत्राम


आमदारांची दिशाभूल करुन सह्या घेतल्या


कोणतीही माहिती न देता काही कागदांवर स्वाक्षरी केली असल्याचे काही आमदारांनी म्हटले असल्याचे दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. पक्षात झालेल्या बंडानंतर आता  राष्ट्रवादी काँग्रेसने 5 जुलै रोजी तालुका अध्यक्ष, राज्य कार्यकारणीची बैठक बोलावली असून राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे सविस्तर मार्गदर्शन करणार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले. पक्षाच्या मान्यतेशिवाय, सत्तारुढ पक्षाकडे जाऊन काही आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असल्याचे पाटील यांनी म्हटले.


ही बातमी वाचा: