मुंबई : विधान परिषदेतील राष्ट्रवादीचे आमदार अपात्रता प्रकरणात (NCP Crisis) विधीमंडळाच्या वतीनं पुढील दोन दिवसात निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या बाबतीत निवडणूक आयोगानं निर्णय दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या बाबतीत नेमकी काय स्थिती आहे याबाबतची माहिती मागवण्यात येणार आहे. 6 ऑक्टोबरला निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे.
सध्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या वतीने निवडणूक आयोगात पक्ष आणि चिन्ह यावर दावा सांगणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. 6 ऑक्टोबरला याबाबत निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने या आधीच राष्ट्रवादीत गट निर्माण झाल्याचे मान्य करून सुनावणीसाठी तारीख दिली आहे. दुसरीकडे शरद पवार गटाच्या वतीने पक्षात फूट पडलीच नसल्याचं सातत्याने सांगण्यात येत आहे. विधान परिषदेतील याचिकेसंदर्भात विधिमंडळ याच विविध प्रश्नांसंदर्भात निवडणूक आयोगाकडून माहिती घेणार आहे.
अजित पवारांच्या एका जुन्या वक्तव्याचा संदर्भ देण्यात येणार
राष्ट्रवादी पक्षामध्ये चिन्ह आणि पक्ष कुणाचा याबाबत सहा ऑक्टोबरला निवडणूक आयोगात सुनावणी पार पाडणार आहे. या सुनावणी दरम्यान शरद पवार यांच्या गटाच्या वतीने अजित पवारांच्या एका जुन्या वक्तव्याचा संदर्भ देण्यात येणार असल्याची माहिती आहे.अजित पवार विरोधी पक्षनेते असताना त्यांनी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर सांगितलेला दावा याबाबत टीका करताना उद्या कोणीही उठेल आणि पक्षावर दावा सांगेल. निवडणूक आयोग उद्धव ठाकरे यांना न्याय देईल आणि पक्ष आणि चिन्ह त्यांच्याकडेच राहील असं म्हटलं होतं. यावेळी त्यांनी मनसेच्या एका आमदाराचे उदाहरण देखील दिल होतं.
निर्णयाचा थेट परिणाम छोट्या पक्षांवर
अजित पवार यांनी केलेल्या दाव्यामध्ये जर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिला तर याचा थेट परिणाम देशातील सर्व छोट्या पक्षांवर होईल अशी भीती देखील व्यक्त केली होती आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत साधर्म्य साधणारी भूमिका अजित पवार यांनी देखील घेतली आहे.
निवडणूक आयोगाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष
एकीकडे प्रफुल पटेल यांनी पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळणार आहे असा दावा केला होता. तर दुसरीकडे निवडणूक आयोग प्रफुल पटेल ज्याप्रकारे दावे करत आहेत त्यावरून त्यांना झुकते माप देण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. शिवाय आम्ही आमचं म्हणणं निवडणुक आयोगात सहा तारखेला मांडू असे देखील म्हटले आहे.एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निवडणूक आयोगाची होणारी सुनावणी आणि त्यांचा पक्षाबाबत येणारा निकाल हा देशातील सर्व छोट्या पक्षांवर परिणाम करणारा असणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे