जालना : रेल्वेच्या स्लीपर कोचमध्ये झोपलेल्या प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यात आलं आहे.
नांदेडहून औरंगाबादला जाणाऱ्या रेल्वेत मोबाईल चोरणाऱ्या टोळीला जालना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.


स्लीपर कोचमधील प्रवासी झोपल्यानंतर पहाटे एक ते चार वाजताच्या दरम्यान हे चोरटे प्रवाशांचे मोबाईल चोरुन पसार होत. दररोज दहा मोबाईल चोरण्याचं चोरांचं टार्गेट होतं. गेल्या दीड वर्षांपासून हे तिघंही प्रवाशांच्या खिसे, बॅगेतून मोबाईल चोरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टोळीमध्ये दोघं जण परराज्यातील रहिवासी असून एक जण जालन्याचा आहे. आशिष बारीय, नागनाथ सुतवणे आणि सागर कवडे अशी आरोपींची नावं आहेत.

जालना शहरात काही जण चोरीचे मोबाईल विकत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींचा शोध घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून 50 हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.