Ukraine Russia War : सध्या युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरु आहे. आज या युद्धाचा सातवा दिवस आहे. याचे गंभीर परिणाम होत आहेत. अनेक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्या विद्यार्थ्यांना आणण्याचे काम सध्या सुरु आहे. दरम्यान, युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या युद्धावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar)यांनी ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी रशिया आणि भारताची तुलना केली आहे. यामध्ये त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर निशाणा साधलाय.
नेमकं काय म्हटलं रोहित पवारांनी
सध्याच्या परिस्थितीत आपल्याला रशियाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. जेव्हा एखादा देश एकाच व्यक्तीच्या विचाराने चालतो तेव्हा त्याचे गंभीर दुष्परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतात. आपणच बरोबर आहोत असं त्या नेत्याला वाटतं तेव्हा त्याला थांबवणंही अवघड असतं असे रोहित पवार म्हणालेत.
रशियातील एका व्यक्तीच्या अहंकारामुळे संपूर्ण जगाला प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. अहंकाराने भरलेल्या अशा व्यक्तीने एखादा खेळ सुरू केला आणि त्यात त्याचा पराभव होत असला तरीही माघार न घेण्याची त्याची प्रवृत्ती असते. यामुळं संपूर्ण जग आज वेठीस धरलं गेल असल्याचे रोहित पवार म्हणालेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर केली. तसेच लोकशाही टिकवणं हे लोकांच्याच हाती असतं आणि लोकशाही चिरडण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर लोकांनीच पुढं येऊन ती वाचवण्याची गरज आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.
भारताबाबत विचार करताना आपल्याला संरक्षणावर खर्च करावाच लागेल पण आज महागाई आणि बेरोजगारीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केलं आहे. मोठ्या प्रमाणात संरक्षणावर खर्च वळवणं आपल्यासारख्या देशाला परवडणार नाही. अन्यथा देशात अनेक अडचणी वाढू शकतात असेही ते म्हणालेत. आज विकास सोडून सर्व प्रकारचं केवळ राजकारण होत असल्याचं दिसतं आहे. याचा फटका सर्वसामान्य माणसाला सहन करावा लागतोय. त्यामुळं देशात सर्व राज्यांना विश्वासात घेऊन विकासाचा अजेंडा तयार करणं आणि कोणत्याही राज्याबाबत भेदभाव न करता तो राबवणं अधिक गरजेचं असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: