मुंबई : आईवडिलांना शिव्या द्या चालेल, पण पंतप्रधान नरेंद मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना शिव्या देणं सहन करणार नाही, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरातून वेगगेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका केलीय. 


काय म्हणाले रोहित पवार?


“आदरणीय चंद्रकांतदादा, तुमच्या नेत्यांचा आदर सर्वांनाच आहे. पण आपल्या नेत्यांचे गुणगाण गाताना कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृतीची बदनामी होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. यामुळे सध्या खालावणाऱ्या राजकीय पातळीला काही स्तर आहे की नाही, असा प्रश्न मला पडतो”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा उल्लेख खरत ट्विट करून त्यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.  






काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
चंद्रकांत पाटील यांचा पुण्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यामुळे गुरुवारी पुणे भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघामधील निवडणूक आणि त्यावेळी झालेल्या आरोप-प्रत्यारोपांविषयी भाष्य केलं. “हातकणंगल्यात रोज उठून राजू शेट्टी पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांना शिव्या द्यायचे. माझे खूप चांगले मित्र आहेत. म्हटलं तुम्ही चूक करताय. परवा आपल्या एका केंद्रीय नेत्याची आणि त्यांची भेट झाल्यानंतर ते म्हणाले की दादांनी मला संपवलं. ते केंद्रीय नेते ४० वर्ष माझ्याशी जोडलेले असल्याने म्हणाले की दादा कोणाला संपवत नाही. आई-वडिलांना शिव्या द्या चालेल. ते म्हणतील जाऊ दे. आईवरुन शिव्या देणं आमची कोल्हापूरची पद्धत आहे. पण  चंद्रकांत पाटील मोदी आणि शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाहीत”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. 


दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. अनेक नेते आपापल्या पद्धतीने चंद्रकांत पाटील यांच्या या वकत्व्यावर व्यक्त होत आहे.