Rohit Pawar on BJP: अकोलेत ‘जागतिक आदिवासी दिना’च्या दिवशी निघालेल्या मिरवणुकीत पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘जागतिक आदिवासी दिन’ हा आदिवासींच्या स्वाभिमानाचा दिवस असतानाही भाजपने तो साजरा केला नाही. ज्यांनी साजरा केला त्यांच्यावर लाठीमार करुन भाजपाला नेमकं काय साध्य करायचंय? आदिवासींचा एवढा द्वेष बरा नसल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार ट्विट करत म्हणाले की, आदिवासी हा देशाचा मूळ निवासी आहे, मात्र आदिवासी समाजाला आजही दुय्यम वागणूक दिली जाते. काल अकोले इथं निघालेल्या मिरवणुकीत ‘जागतिक आदिवासी दिना’च्या दिवशीच या सरकारने आदिवासींवर लाठीचार्ज केला आणि स्वतः आमदारांनीच याची कबुली दिली. आदिवासी नागरिकांवर केलेल्या या लाठीचार्जचा जाहीर निषेध! 

Continues below advertisement


अजितदादांच्या आमदाराने काढलेल्या मिरवणुकीत गृहविभागाकडून लाठीचार्ज केला जातो, याचा अर्थ सरकारमधील तीन पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न आहेत, हेही यानिमित्ताने स्पष्ट होतं. पण कुरघोडीच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांकडून आदिवासींना दुय्यम वागणूक मिळत असेल तरी आम्ही मात्र त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. ‘जागतिक आदिवासी दिन’ हा आदिवासींच्या स्वाभिमानाचा दिवस असतानाही भाजपाने तो साजरा केला नाही आणि ज्यांनी साजरा केला त्यांच्यावर लाठीमार करुन भाजपाला नेमकं काय साध्य करायचंय? आदिवासींचा एवढा द्वेष बरा नाही..!


एकत्र येऊ नये म्हणून गृहखात्याने लाठीचार्ज केला


रोहित पवार म्हणाले की, राज्याचे आदिवासी मंत्री यांनी कुठेही जागतिक आदिवासी समाजाच्या दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या नाहीत. भाजपच्या कोणत्याच नेत्याने शुभेच्छा दिल्या नाहीत. कारण भाजपचे तसे आदेश होते. नागपूरमध्ये आदिवासी समाजाचा मोठा कार्यक्रम होता त्याला देखील परवानगी दिली नाही. भाजपकडून आदिवासी वेगळे आणि इतर लोक वेगळी असा प्रयत्न सुरू आहे. अजित पवारांच्या पक्षाचा अकोले येथील आमदाराने एक कार्यक्रम घेतला होता. काल आदिवासी समाजाच्या दिनानिमित आयोजित कार्यक्रमात आदिवासी बांधवांवर लाठीचार्ज करण्यात आला. समाज एकत्र येत होता त्याला एकत्र येऊ नये म्हणून गृहखात्याने लाठीचार्ज केला.


खनिज मिळवण्यासाठी आदिवासी समाज शब्द बदलला


त्यांनी सांगितले की, भाजपने आदिवासी समाजाला आता वेगळ नाव दिलं आहे. ते आदिवासी म्हणत नाहीत ते वनवासी म्हणतात. आदिवासी या शब्दाचा अर्थ काय होतो तर आधीपासून वास करणारे. वनवासी म्हणजे जे वनात राहणारे असं त्यांचं म्हणणं आहे कारण आदिवासी समाज ज्या ठिकाणी राहतो त्याच्या खाली खनिजे दडली आहेत. ते खनिज मिळवण्यासाठी यांनी आदिवासी समाज शब्द बदलला यामुळे असं म्हणता येईल की हे वनवासी आहेत त्यामुळे हे बाहेरून आलेले आहेत. त्यामुळे यांचा त्या जमिनीवर हक्क नाही. 


आदिवासी समाजाचे महिन्याला 350 कोटी रुपये काढले जात आहेत 


ते पुढे म्हणाले की, यांनी आता जनसुरक्षा विधेयक आणले आहे. सूरजागडसारखे प्रकल्प होऊ नये आदिवासी समाज जगला पाहिजे यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्यांना जेलमधे टाकण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. राम मंदिर बनवल गेलं संसद बनवण्यात आली त्यावेळी देशातील महत्वाचं पद असलेल्या राष्ट्रपतींना उद्घाटनासाठी का बोलावण्यात आलं नाही. आदिवासी आहे म्हणून? म्हणजे केवळ तुमच्या फायद्यासाठी वापरण्यात येणार आहे का? आदिवासी विभागाला वेगळं बजेट व्हावं यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केले आणि त्यांनी लागू देखील केल महाराष्ट्र हे हा निर्णय घेणारे पहिले राज्य होते. आदिवासी समाजाचे महिन्याला 350 कोटी रुपये काढले जात आहेत आणि ते दुसऱ्या विभागाला देत आहेत म्हणजे वर्षाचा विचार केला तर 4 हजार कोटी रुपये तुमच्या विभागाचे काढून दुसऱ्या विभागाला देण्यात येत आहे. एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अॅम्बुलन्स आली नाही म्हणून एका गर्भवती महिलेचे बाळ मृत्युमुखी पडले. त्या महिलेले बाळ प्लास्टिकच्या पिशवीत घरी घेऊन जाव लागलं. ही अच्छा सरकारची परिस्थिती आहे. 


राज्यात 1 कोटी आदिवासी समाज आहे टीआरटी विभागाला यांनी केवळ 3 कोटी रुपये दिले आहेत. राज्यात 35 लाख आदिवासी तरुण आहेत जे शिकत आहेत त्यांना एवढे पैसे पुरतील का? हे एका कार्यक्रमासाठी 15 कोटी रुपये खर्च करतात आणि आता यांना आदिवासी मुलाना शिकण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या संस्थेसाठी केवळ 6 कोटी रुपये दिले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या