मुंबई : कर्जत जामखेडमधून पराभूत झालेले भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी रोहित पवारांच्या आमदारकीला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. चुकीच्या पद्धतीने निवडणूक लढवल्याचा आरोप राम शिंदें यांनी रोहित पवारांवर केला. याप्रकरणी रोहित पवारांना समन्स जारी करण्यात आलं आहे.


राम शिंदेंच्या याचिकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने रोहित पवारांना समन्स बजावलं आहे. राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मतदारांना पैसे वाटण्यासाठी रोहित पवार यांनी बारामती अॅग्रो कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा वापर केला. तसेच व्हॉट्सअॅपवर अपप्रचार केला असे आरोप राम शिंदेंनी रोहीत पवार यांच्यावर लावले आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या निवडणूक लढण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी झाली. कर्जत-जामखेडमधून दोनदा निवडून आलेले माजी आमदार रामदास शिंदे आणि अपक्ष उमेदवार राजेंद्र पवार यांनी ही याचिका दाखल केली होती.


रोहित पवारांनी मतदारांना आमिष दाखवणे व अन्य गैरप्रकारांचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मतदारांना प्रभावित केल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. या प्रकरणात न्यायालयाने रोहित पवार यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी 13 मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. यानंतर याचिकेवर सुनावणीदेखील होऊ शकते.