सोलापूर : सोलापुर-तुळजापूर महामार्गावर तामलवाडीजवळ एक गॅस सिलेंडर मालवाहू ट्रकमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. एका नंतर एक असे जवळपास 10 ते 12 सिलेंडरचा यामध्ये स्फोट झाले. तर 30 ते 35 सिलेंडरचे नुकसान या दुर्घटनेत झाले आहे. HP कंपनीचे घरघुती गॅस घेऊन हा ट्रक सोलापुरातून तुळजापूरकडे निघाला होता ज्यामध्ये 306 सिलेंडर होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.


मात्र ट्रक पूर्णपणे जळून गेली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की जवळपासच्या 2 किलोमीटर परिसरात आवाज घुमत होता. नजीकच्या ग्रामस्थांना पोलिसांनी तात्काळ दुसरीकडे स्थलांतर केलं. गावकर्‍यांनी स्थानिक पोलिसांना आणि अग्निशमन दलाला माहिती लवकर कळल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र घटनास्थळापासून अगदी 500 मीटर अंतरावर टोल प्लाझा आहे. या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा असती तर इतका मोठा स्फोट ही झाला नसता असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला.


आगीची माहिती मिळताच सोलापूर आणि तुळजापूर अग्निशमन दलाचे अधिकारी, तुळजापूर आणि उस्मानाबाद विभागातील पोलीस अधिकारी, महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी यांनी घटनास्थळी येत पाहणी केली. सुरक्षेच्या दृष्टीने सोलापूर तुळजापूर महामार्गाची वाहतूक जवळपास चार तास थांबवून ठेवण्यात आली होती. ज्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा ही लागल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान ट्रकच्या कॅबिनमध्ये अज्ञात कारणावरून आगीच्या ठिणग्या येत होत्या.




त्यावेळी वाहनचालकाने तात्काळ गाडीला बाजूला घेत सिलेंडरमागे करण्याचा प्रयत्न केला. एका सिलेंडरला आग लागल्यानंतर चालकाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ती आग विझवण्याचा ही प्रयत्न केला. वाहन चालकाच्या या प्रसंगवधनाणे मोठी हानी टळली. घटनास्थळापासून अगदी 500 मीटरच्या अंतरावर टोल नाका आहे, मात्र तिथे कोणतीच अग्निशमन यंत्रणा नसल्याचं समोर आलं आहे. लवकर अग्निशमन यंत्रणा उपलब्ध झाली असती तर इतका मोठा स्फोट झालाच नसता, असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. जवळपास साडेतीन तासानंतर सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील वाहतूक सुरु झाली आहे.