मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने आज आपलं बहुमत सिद्ध केलं. महाविकास आघाडीला 169 सदस्यांनी मतदान केलं, तर विरोधात शून्य सदस्यांनी मतदान केलं. या बहुमत चाचणीदरम्यान सभागृहात भाजपने मोठा गोंधळ घातला. या गोंधळावर आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. भाजप गोंधळ घालण्यासाठी अत्यंत योग्य पक्ष आहे, असा टोला रोहित पवारांनी लगावला.
विधानसभेचा मान ठेवणे प्रत्येक आमदाराची जबाबदारी आहे. सभागृहात उगाच आवाज करायचा, गोंधळ घालायचा आणि एखादा मुद्दा लोकांपर्यंत घेऊन जायचा प्रयत्न करायचा. विरोधी पक्षाच्या अशा कृतीकडे इथून पुढे आम्ही दुर्लक्ष करु. आम्ही सर्व नवीन आमदार एकत्र राहून कामकाज सुरु ठेऊन, लोकांच्या सेवेसाठी पुढील पाच वर्ष लोकांच्या सेवेसाठी कटीबद्ध राहू, असा शब्द रोहित पवारांनी दिला.
भाजप गोंधळ घालण्यासाठी अत्यंत योग्य पक्ष आहे. गोंधळ कसा घालायचा याची चांगली माहिती त्यांना आहे, असं मला वाटतं. सरकार कशा पद्धतीने ते चालवतात, हे आपण गेल्या पाच वर्षात पाहिलं आहे. आज त्यांनी पहिल्याच दिवशी गोंधळ घातला ठिक आहे, तरीही आम्ही शांत होतो. मात्र नंतर नुसता गोंधळ भाजपला घालायचा असेल तर आम्ही नवीन आमदार ते चालू देणार नाही. विधिमंडळ नियमानुसार योग्य पद्धतीने उत्तर आमच्याकडून भाजपला दिलं जाईल, असा इशाराच रोहित पवारांनी दिला.
आज बहुमत चाचणीदरम्यान मुद्दे भरकटवून गोंधळ घालायचा, हे भाजपचं आधीच ठरलं होतं. तसेच सभात्याग करायचा हे देखील आधीच ठरलं असावं, असा अंदाज रोहित पवारांनी व्यक्त केला. सभागृहात काय नाटक झालं हे लोकांना माहिती आहे. लोकांनी महाविकास आघाडीला दिलेला कौल आम्ही मान्य करुन अशा गोंधळातही लोकांसाठी काम करु, असं आश्वासन रोहित पवारांनी दिलं.