मुंबई :  राष्ट्रवादीचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांना ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या आधी अटक होऊ शकते अशी शक्यता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ठाणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांची आज बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून जितेंद्र आव्हाड यांना खोट्या केसेस टाकून अटक होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


नगरसेवकांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांना अटक होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली आहे. "आमच्या नगरसेवकांना धमकी देण्यासह पक्षात प्रवेश करावा म्हणून दबाव आणला जात आहे. ठाणे पालिकेवर आता प्रशासक आहे. परंतु, फक्त सत्ताधारी पक्षात आला तरच निधी दिला जातो. जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोट्या केस टाकून निवडणुकीआधी अटक करु शकतात, अशी भीती आनंद परांजपे यांनी व्यक्त केली आहे.  


"आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना फोडण्यासाठी वेगवेगळी आश्वासने शिंदे गटाकडून देण्यात येतील. मात्र, अशा आश्वासनांना नगरसेवकांनी बळी पडू नये. या निवडणुकीपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक होण्याची शक्यता आहे. जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली तरीदेखील पूर्ण क्षमतेने आपल्याला या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. प्रसंगी जितेंद्र आव्हाडांशिवाय आपल्याला ही निवडणूक पार पाडायची आहे. सध्या जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत आनंद परांजपे यांना देखील पोलिसी कारवायांमध्ये अडकवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र आपण कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही, अशी चर्चा नगरसेवकांच्या बैठकीत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.    


दरम्यान. ठाण्यातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून गळाला लावण्याचे प्रकार सुरु असल्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गेल्या चार -पाच दिवसांपूर्वी बाळासाहेबांच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केला होता. पैशवाल्या शिवसेनेच्या नेत्यांकडून कळवा-मुंब्र्यामधील नगरसेवकांना खुलेआम एक कोटी रूपयांची ऑफर दिली जात असल्याचा गंभीर आरोप आव्हाडांनी केला होता. तसेच पत्नीला देखील एक कोटी रूपये आणि नगरसेवक असेल तर तुला तिकीट देतो आणि आता तुला दहा कोटी रूपयांची कामे देतो अशा पध्दतीने राष्ट्रवादी फोडण्याची पध्दत अवलंबली जात असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. ट्वीट करून जितेंद्र आव्हाड यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले होते.