सांगली : सांगलीतील राष्ट्रवादीचे नेते मनोहर पाटील यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अवघ्या काही तासात अटक करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेचे सांगली जिल्हा उपप्रमुख दिनकर पाटील यांच्यासह तिघांचा समावेश आहे. शिवसेना पदाधिकारी दिनकर पाटील यांनी पुतण्याच्या मदतीने राष्ट्रवादीचे नेते मनोहर पाटील यांची काल रात्री हत्या केली. याप्रकरणी दिनकर पाटीलसह अभिजीत पाटील, विनोद पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे. पूर्ववैमनस्यातून मनोहर पाटील यांची हत्या झाल्याचा आरोप आहे. मनोहर पाटील हे राष्ट्रवादीचे नेते आणि कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी सभापती होते.


मनोहर पाटील बुधवारी संध्याकाळच्या सुमारास कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग येथील बोरगाव रस्त्यावर काही जणांसोबत बोलत उभे होते. त्यावेळी अचानक काही जणांनी येऊन मनोहर पाटील यांच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला चढवला. अचानक घडलेल्या हल्ल्यामुळे पाटील यांना स्वत:चा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही. पाटील यांना गंभीर जखमी करुन हल्लोखोर पसार झाले. दरम्यान तेथे उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांनी मनोहर पाटील यांना तातडीने मिरज येथील मिशन रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हत्येप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या काही तासात तीन जणांना अटक केली.


सांगलीत राष्ट्रवादीच्या नेत्याची निर्घृण हत्या, पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज


कोण आहेत मनोहर पाटील


मनोहर पाटील हे कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोली गावचे रहिवाशी होते. या गावचे ते उपसरपंच राहिले होते. 2017 मध्ये पंचायत समिती सदस्यपदाची निवडणूक त्यांनी लढवली आणि ते विजयी देखील झाले होते. कवठेमहांकाळ पंचायत समिती सभापती पदही त्यांनी भूषवलं होतं. सध्या मनोहर पाटील हे कवठेमहांकाळ येथील महाकाली साखर कारखान्याचे संचालक होते.


चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या आनंदराव पाटलांची हत्या


चार दिवसांपूर्वी पलूस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस नेते आनंदराव पाटील यांची हत्या झाली होती. आनंदराव पाटील यांच्या डोक्यात वार करून हल्लोखोर पसार झाले होते. राजकीय वादातून हा हल्ला झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या हल्ल्यात पाटील गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आनंदराव पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्वीय सचिव गजानन पाटील यांचे बंधू होते.