सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या परिक्रमा आणि जलसमाधी घेण्याच्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित केला आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना 2019 च्या निकषांप्रमाणे अधिकची मदत देण्याचा निर्णय 27 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला असताना राजू शेट्टींनी  जलसमाधी घेण्यासारखी टोकाची भूमिका घेण्याची आवश्यकता नाही. राजू शेट्टींची आम्हाला गरज आहे. आजही ते महाविकास आघाडी सरकारचे घटक आहेत. आंदोलन करण्यापूर्वी राजू शेट्टी यांनी आमच्याशी संपर्क साधला असता तर त्याना 27 ऑगस्ट रोजी झालेल्या निर्णयाची माहिती दिली असती असेही पाटील म्हणाले.


जयंत पाटील म्हणाले की, सांगली, कोल्हापूर आणि अन्य ठिकाणच्या पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 27 ऑगस्टलाच 2019 च्या निकषाप्रमाणेच वाढीव मदत देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः हा निर्णय घोषित देखील केलाय. त्यामुळे वाढीव मदत देण्याचा निर्णय झाला असताना यासाठी परिक्रमा किंवा आंदोलने करण्याची गरज नव्हती. आता अलीकडे ज्या भागात पूर येऊन गेला तेथील नुकसानीचा आकडा आला की राज्यातील सर्व पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणारच आहे.  त्यामुळे राजू शेट्टींनी या प्रश्नांवरून जलसमाधी घेण्यासारखी टोकाची भूमिका घेण्याची आवश्यकता नाही, असं पाटील म्हणाले. 


मी महाविकास आघाडीचा गुलाम नाही; पूरग्रस्तांना मदत देताना सरकार चुकलंय : राजू शेट्टी


त्यांनी म्हटलं की,  राजू शेट्टींची आम्हाला गरज आहे. आजही ते  महाविकास आघाडी सरकारचे घटक आहेत. आंदोलन करण्यापूर्वी राजू शेट्टी यांनी आमच्याशी संपर्क साधला असता तर त्याना 27 ऑगस्ट रोजी झालेल्या निर्णयाची माहिती दिली असती असेही जयंत पाटील म्हणाले. तसेच केंद्र सरकारने यावर्षी आलेला पूर आणि अतिवृष्टी बाबत कोणतीही मदत केलेली नाही.राज्य सरकारने या संकटाने झालेल्या नुकसानीची माहिती केंद्र सरकारला दिलेली आहे. केंद्राकडूनही आम्हला मदतीची अपेक्षा आहे, असंही ते म्हणाले. 


जयंत पाटील म्हणाले की, आता मराठवाडा, खानदेशात काही ठिकाणी अतिवृष्टी झालीय. या नुकसानीच्या बाबतीत केंद्र सरकारकडे राज्य सरकारने संपर्क केलाय. केंद्राने देखील लवकर निधी द्यावा. केंद्राने अजून काही मदत दिली नाही. एक वर्षांपूर्वी केंद्राने जी मदतीची घोषणा केली होती ती मदत देखील अजून मिळाली नाही. केंद्र सरकारचा निधी येऊ अथवा न येऊ पण राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. यात केंद्र सरकार देखील लवकर सहभागी होईल अशी अपेक्षा आहे, असे जयंत पाटील यांनी आश्वासन दिले आहे.


मी महाविकास आघाडीचा गुलाम नाही- राजू शेट्टी


मी महाविकास आघाडीचा गुलाम नाही, जिथं महाविकास आघाडी सरकार चुकतंय तिथे मी सरकारविरोधात ठामपणाने बोलणार. पूरग्रस्तांना मदत देताना सरकार चुकलंय, मी पॅकेज देणारा माणूस नाही असे मुख्यमंत्री म्हणाले होते. पण, पूरग्रस्तांना सरकारकडून काहीच मिळाली नाही, असे म्हणत पूरग्रस्तांसाठी इस्लामपूरमध्ये काढलेल्या आक्रोश मोर्चामध्ये राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय.  महाविकास आघाडी निर्माण करणाऱ्यापैकी मी एक आहे, मी आजही महाविकास आघाडीमध्ये आहे असेही शेट्टी म्हणालेत. मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारने पूरग्रस्तांची फसवणूक केली आहे. तसेच पूरग्रस्तांच्या पुनर्वसन बाबतीत सरकार आता व्यापार करत आहेत, अशी टीकाही शेट्टी यांनी केली आहे. पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी आम्ही जलसमाधी घेऊ, पण सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देखील राजू शेट्टी यांनी यावेळी दिला आहे.