सांगली : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर राज्यातल्या राजकारणात चर्चेला ऊत आला आहे. काल मुख्यमंत्र्यांनी (CM Uddhav Thackeray) स्वबळाच्या घोषणांवर टोला लगावल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काँग्रेसनं शेवटपर्यंत स्वबळाचा आग्रह धरला तर शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येईल, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. काँग्रेस आता जरी स्वबळावर बोलत असली तर परिस्थिती येईल त्यावेळी सगळे आम्ही एकत्र लढू असं आम्हाला वाटतं आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
महाविकास आघाडी तुटावी असा सरनाईक यांचा काही भाव असेल असे वाटत नाही- जयंत पाटील
प्रताप सरनाईक यांच्या पत्राबाबत बोलताना ते म्हणाले की, प्रताप सरनाईकहे आघाडी टिकावी या मताचे आहेत. हे मी अनेकवेळा खासगीत ही ऐकले आहे. पण त्यांनी मुख्यमंत्र्यांना कोणत्या विषयावर पत्र लिहिलं आहे हे मला माहित नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महाविकास आघाडी तुटावी असा सरनाईक यांचा काही भाव असेल असे वाटत नाही, असं जयंत पाटील म्हणाले. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वितुष्ट येणार नाही याची आम्हाला खात्री आहे. पण शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये काही वाद आहे, अशी परिस्थिती नाही. पण सरनाईक यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी-शिवसेना कार्यकर्त्यांचा वाद झालाय का? हे पाहावे लागेल असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अनेक राजकीय पक्ष या कोरोना काळात सुद्धा स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ. ताकद तर कमावलीच पाहिजे. पण स्वबळ म्हणजे काय? स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यापुरतं असू नये. निवडणुका येतात आणि जातात. स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल लगावला होता. आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ. स्वबळावर लढणं हा आमचा हक्क आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ते म्हणाले की, स्वबळ म्हणजे फक्त निवडणुका लढणे नाही तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे म्हणजे स्वबळ आहे. ज्यावेळी शिवसेना स्थापन झाली तेंव्हा मराठी माणूस क्षुल्लक होता. मान सोडाच परंतु अपमान सहन करत होता. शिवसेना तेंव्हा स्थापन झाली नसती तर... जे माझे आजोबा सांगायचे आणि शिवसेनाप्रमुख सांगायचे ते म्हणायचे आत्मविश्वास आणि आत्मबळ महत्त्वाचं आहे, असं ठाकरे म्हणाले.
काय म्हणाले होते नाना पटोले
आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असून आमच्या मित्र पक्षांचं काय प्लानिंग आहे याबद्दल मला कल्पना नाही असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते. नाना पटोले म्हणाले होते की, "ज्या काही आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत त्यामध्ये काँग्रेस स्वबळावर लढेल. ते आमचे मित्र पक्ष आहेत आणि मित्र पक्षांचं प्लानिंग वेगळं असेल, आम्ही काँग्रेस म्हणून आमची तयारी सुरू केलीय. विधानसभा असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असेल, या निवडणुका स्वबळावर लढण्याची आमची तयारी सुरु झालेली आहे. राष्ट्रवादी आमचा मित्र पक्ष आहे त्यामुळे बसून काय निर्णय होईल ते बघू. परंतु आज आमच्या समोर त्यांचा कुठला प्रस्ताव नाही."