मुंबई : राज्य सरकारला, स्थानिक अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना माहिती न देता लोकांचे प्राण वाचवणारं रेमडेसिवीरसारखं औषध भाजपवाले कसे खरेदी करु शकतात? नवीन कायदा आला आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. एका साठेबाजाची बाजू घेण्यासाठी राज्यातील दोन विरोधी पक्षनेते रात्रीच्या वेळी पोलिस स्टेशनमध्ये जातात असं म्हणत जयंत पाटील यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
दरम्यान साठेबाजाला चौकशीला बोलावून दोन तास चौकशी केल्याबद्दल जयंत पाटील यांनी पोलिसांचे कौतुक देखील केले. पोलिसांनी त्यांचं काम चोखपणे पार पाडलं आहे असेही जयंत पाटील म्हणाले आहेत.
रेमडेसिवीर औषधांची निर्यात करणाऱ्या ब्रुक्स फार्मा या कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतलं. त्यानंतर राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळाव्यात या प्रामाणिक हेतूने आम्ही सारे प्रयत्न करीत आहोत, असं म्हटलं होतं. तसंच काही दिवसापूर्वी भाजपचे नेते दमणला जाऊन आले आणि 50 हजार रेमडेसिवीरची इंजेक्शन आम्ही महाराष्ट्रात वाटू असं ट्वीट केलं होतं. यावर जयंत पाटील यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
काय आहे प्रकरण?
Bruck Pharma कंपनीचे संचालक राजेश डोकानिया यांना त्यांच्याकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा असल्याच्या माहितीवरुन चौकशीसाठी पोलीसांनी ताब्यात घेतलं. ही माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांना मिळाली. त्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांनी पार्ले येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. तसेच वळसे पाटील यांनी फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, हे सहन केलं जाणार नाही, असा इशारा देखील दिला.
'फडणवीसांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, हे सहन केलं जाणार नाही' : गृहमंत्री वळसे पाटील
काय म्हणाले फडणवीस
या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, विरोधी पक्षाचा आव्हानावर रेमडेसिवीर देणार असल्याने हे कुभांड रचले गेले. चौकशीला मी भीत नाही, जनतेसाठी कुठल्याही स्तरावर जायला तयार आहे. नवाब मालिकांच्या जावयावर नार्कोटिक्स कारवाई केली तेव्हापासून ते पिसाळलेल्यासारखे आरोप केंद्रावर करत आहेत. ते म्हणाले की, गृहमंत्री मॅच्युअर्ड आहेत पण त्यांना मला सांगावसं वाटतं की, ती कंपनी महाराष्ट्राला रेमडेसिवीर द्यायला तयार होती. मात्र विरोधी पक्षाने त्यांना आवाहन केलं आहे एवढ्या करिता त्या ठिकाणी स्टोरी रचून त्या व्यक्तीला पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. आम्ही जाऊन पोलिसांना विचारलं यांच्याकडे साठा आहे का? यांनी कुठला गुन्हा आहे? का त्यावर उत्तर नाही असेच होते, असं फडणवीस म्हणाले.
'वळसे पाटील, तुम्ही कमिशनसाठी अडून बसला आहात!, गुन्हा दाखल करा आम्ही घाबरत नाही' : चंद्रकांत पाटील
ते म्हणाले की, चौकशीला मी घाबरत नाही. मी जनतेसाठी काम करतो. 36 केस अंगावर घेतल्या आहेत. महाराष्ट्राच्या हिताकरता मी कुठल्याही स्तरावर जाईल. राजकारण करण चुकीचं आहे. बातम्या पसरविले जात आहेत की, त्यांच्याकडे साठा होता तो त्यांनी दाखवावा. त्या ठिकाणी डीसीपींनी कबूल केलं की, कुठलाही साठा नव्हता, असं फडणवीसांनी सांगितलं.
नवाब मलिकांच्या आरोपावर बोलताना फडणवीस म्हणाले की, त्यांच्या जावयाला अटक झाली तेव्हापासून ते पिसाळल्यासारखे बोलत असतात. मला त्यावर काही बोलायचं नाही, त्यांना उत्तर द्यायचं नाही, त्यांचं उत्तर केंद्रीय मंत्र्यांनी दिलं आहे.