मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सरकारी कामात हस्तक्षेप केला, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी म्हटलं आहे. येत्या दिवसांमध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी निर्णय घेतला जाऊ शकतो, असं वळसे पाटील म्हणाले आहेत. Bruck Pharma कंपनीचे संचालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर चौकशीसाठी पोलीसांनी त्यांना पार्ले येथील पोलीस ठाण्यात घेऊन आले. ही माहिती मिळताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांनी पार्ले येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी पार्ले पोलीस स्टेशनमध्ये देवेंद्र फडणवीस आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाल्याची माहिती मिळाली होती.
'वळसे पाटील, तुम्ही कमिशनसाठी अडून बसला आहात!, गुन्हा दाखल करा आम्ही घाबरत नाही' : चंद्रकांत पाटील
या प्रकारावर बोलताना गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, पोलिसांवर दबाव टाकणं योग्य नाही, या पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. पोलिसांना माहिती मिळाली की मुंबईत जवळपास 50 हजार रेमडेसिवीर येत आहेत. त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी ब्रुक्स फार्मा या कंपनीच्या संचालकांना पोलिसांनी काल पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं असता, त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर त्या ठिकाणी पोहोचले. जर एखाद्या प्रकरणात पोलिसांना चौकशी करावीशी वाटली तर पोलिस कोणालाही बोलावू शकतात, त्या दृष्टीने त्यांना बोलावण्यात आले होते. या ठिकाणी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला. शासकीय कामात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी या निमित्त एवढंच सांगू इच्छितो अशाप्रकार पोलिसांवर दबाव टाकणं हे योग्य नाही. या दृष्टीकोनातून या पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत, असं वळसे पाटील म्हणाले.
वळसे पाटील म्हणाले की, या प्रकरणी कारवाई संदर्भात मी आमच्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करतो आहे आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल. हा जो साठा आहे तो नेमका कुठे जाणार होता? कोणाला दिला जाणार होता? सरकारला दिला जाणार होता की एखाद्या राजकीय पक्षाला दिला जाणार होता. या संदर्भात मुंबई पोलिसांना संपूर्ण चौकशी करण्यास सांगितले आहे, असं वळसे पाटील म्हणाले.