मुंबई : तुमच्यात हिंमत असेल तर येणारी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या म्हणजे 'दूध का दूध, पानी का पानी' होवून जाईल. समोरच्या बाकावर बसलेले राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा इकडे येतील, असा टोला  राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत लगावला.  विधानसभेत अंतिम आठवडा चर्चेत पाटील बोलत होते.


सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले मात्र त्यांच्यावरील कारवाईचा चौकशी अहवाल अद्याप सभागृहात आला नाही. हा मुद्दा सांगतानाच मुख्यमंत्री सभागृहात राजकीय अभिनिवेश करतात आणि मुद्दा सोडून देतात. नुसता शो या सरकारचा सुरु आहे. सरकार जाहिरातीवर खर्च जास्त आणि काम कमी असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

पर्यावरणाचा ऱ्हास करायचा नाही असे असताना सरकारने मीराभाईंदर नगरपालिका हद्दीतील सेव्हन इलेव्हन या हॉटेलला बांधकाम करण्यास परवानगी दिली. मात्र त्याठिकाणी संबंधित हॉटेल मालकाने क्लब बांधला आहे. सुरुवातीला मीराभाईंदर नपाने परवानगी दिली मात्र तक्रार आल्यावर परवानगी रद्द केली. मात्र नगरविकास खात्याने स्टेट हायवे जात असल्याचे दाखवत या हॉटेलला परवानगी दिली. परंतु मालकाने क्लब बांधला. या परवानगी पत्रावर स्वतः मुख्यमंत्र्यांची सही असल्याचा गंभीर आरोप  पाटील यांनी केला.

कांदळवन नष्ट केले म्हणून सहा गुन्हे संबंधितांवर दाखल करण्यात आले आहेत. परंतु त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही? असा सवाल पाटील यांनी केला. भाजपाचे नेते नरेंद्र मेहता यांच्या बंधुंचे हे हॉटेल आहे. मीराभाईंदरमध्ये नरेंद्र मेहता यांची कुणासोबत पार्टनरशिप आहे याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे आणि कशापध्दतीने काम केले जात आहे व त्याला कुणाचा आशिर्वाद आहे असेही  पाटील म्हणाले.

राज्य सरकारने अलीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार केला आणि काही लोकांना त्यात वगळले. प्रकाश मेहता यांनाही वगळले. चोरीचा माल सापडला म्हणजे काही चोराला सोडता येत नाही. त्यामुळे मेहतांना घरी पाठवून काही होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी लोकायुक्ताचा अहवाल दडवून ठेवला. भ्रष्टाचार झाला हे शेंबडं पोरगं पण सांगू शकते त्यामुळे प्रकाश मेहतांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी पाटील यांनी केली.

दर्शन डेव्हलपर्स या कंपनीने सत्ताधारी पक्षाला फंड दिला आहे. ही कंपनी काहीच प्रगती करत नव्हती मात्र त्यांनी सत्ताधारी पक्षाला मोठा फंड दिला. एसआरए प्रकल्पात या कंपनीने प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. या कंपनीने चार कंपन्या स्थापन केल्या आणि 2 हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळवले. पण या कंपनीने कोणतेही प्रोजेक्ट सुरू केले नाही. त्याच कंपनीला मेहतांनी मदत केली याचीही चौकशी व्हायला हवी अशीही मागणी पाटील यांनी केली.