ठाणे : लव्ह जिहादबद्दल (love jihad) राज्यात किंवा देशात जनाक्रोश मोर्चा काढला जातोय. लव्ह जिहादला विरोध हा समाजात असला पाहिजे. परंतु काही विशिष्ट पक्ष किंवा गट निवडणुका जवळ आल्या की असं काहीतरी करतात. हिंदुत्ववादाच्या माध्यमातून मतदान होण्याच्या दृष्टीने राजकीय पक्षाचे हे प्रयत्न असू शकतात असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप आणि शिंदे गटाला लगावला आहे. ते कल्याण शहरात एका सामाजिक संघटनेच्या कार्यक्रमाला आज आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपसह शिंदे गटावर टीका केली.
एकनाथ खडसे यांनी यावेळी सी व्होटर सर्व्हेवरूनही भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला. "महाविकास आघाडीला लोकसभेत चांगल्या जागा म्हणजे चाळीत ते चौवेचाळीस जागा मिळतील असं समोर आलंय. राज्यात ती सद्यपरिस्थिती आहे. त्यावर आधिरीत असा हा सर्व्हे आहे. सध्याचं राज्य सरकार अस्थिर असून सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येतो? त्यावर सरकार अवलंबून आहे. हे सरकार केवळ नाममात्र असून त्यांच्यात समन्वय नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उत्तम काम करत असताना केवळ सत्तेच्या लालसेसाठी पक्ष फोडणे सर्वांना एकत्र करणं हा खटाटोप करण्यात आला, अशी टीका खडसे यांनी केली.
राज्यावर 6 लाख 66 हजार कोटी रुपयांचं कर्ज
एकनाथ खडसे म्हणाले, "राज्यात सध्या बेरोजगारी आणि महागाई असून उद्योग राज्याबाहेर चालले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. राज्यावर 6 लाख 66 हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. सामान्य माणसाला याचा काही लाभ होत नाही म्हणून या सर्व्हेच्या माध्यमातून लोक या सरकारला मदत करणार नाही असंच दिसून येतंय. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीमध्ये सामील होणार की नाही? याबाबत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, या युतीबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत आला नाही किंवा तस बोलणंही झालं नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. तसा प्रस्ताव आला तर वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील.
पेच असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार नाही
सरकार स्थापन होऊन 7 महिन्याचा कालावधी झाला. मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. 18 मंत्री कारभार या राज्याचा पाहताहेत योग्य ते निर्यण घेऊ शकत नाहीत. जनसंपर्क कमी पडत आहे, शिंदे गटाचे सर्व आमदार मंत्रिमंडळात येण्यास इच्छुक आहेत. कोणाला घ्यावे हा पेच असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. एकदा विस्तार होऊ द्या, यातील असंतोष आपोआप उफाळून येईल, मला का डावललं या असंतोषाला तोंड देणे कठीण होईल. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार लंबल्याची टीका यावेळी एकनाथ खडसे यांनी केली.
"डॉक्युमेंटरीमध्ये माझ्या वडिलांचं नाव वापरू नका हा उद्धव ठाकरे यांचे स्वत:चे मत आहे. वस्तुस्थिती आहे ते बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत. डॉक्युमेंटरीमध्ये बाळासाहेबांचे नाव वापरू नये हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे. त्यांच्या व्यक्तिगत मतावर मी प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.