मुंबई : बीडचे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टिकास्त्र सोडलं आहे. उद्याच्या लोकसभेच्या निकालानंतर जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेना, भाजपमध्ये प्रवेश मिळालाच नसता अशी टीका धनंजय मुंडेंनी केली आहे.


"जयदत्त क्षीरसागरांनी पक्ष बदलण्यासाठी आजचाच मुहूर्त निवडला, कारण उद्याच्या निकालामध्ये बीडमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठी लीड मिळणार आहे. त्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांना कोणत्याच पक्षाने प्रवेश दिला नसता. म्हणून त्यांनी आजच पक्षप्रवेश उरकून घेतला, असावा असा टोला धनंजय मुंडेंनी लगावला.


जयदत्त क्षीरसागर यांनी आज आमदारकीचा राजीनामा देऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. "राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय खूप आधी झाला होता. बीडमध्ये जो पक्ष वाढवला त्याच पक्षातील नेत्यांनी कोंडी केली, अशा भावना प्रवेशावेळी क्षीरसागर यांनी बोलून दाखवल्या. तर आनंदाने शिवसेनेत या, तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे काम करू शकाल", अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले.



दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या आदल्याच दिवशी सकाळी बीडमधील राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांची घुसमट बाहेर आली होती. राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्षाला रामराम ठोकत असल्याचा निर्णय क्षीरसागर यांनी जाहीर केला होता.


पक्षामध्ये होणाऱ्या अवहेलनेमुळे बऱ्याच दिवसांपासून घुसमट सुरु होती. ती कुठपर्यंत सहन करायची, हा प्रश्न कार्यकर्तेही विचारत होते. जिथे स्वाभिमानाला ठेच पोहचते तिथे राहण्यात स्वारस्य नव्हतं, अशा भावना जयदत्त क्षीरसागर यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना व्यक्त केल्या होत्या.