अजित पवार यांनी आज पनवेल येथे काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी आघाडीच्या उमेदवारासाठी कामाला लागा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. मात्र बैठकीत बोलताना त्यांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत भाष्य केले नाही.
त्यांना पार्थ पवार यांच्यासाठी आपण पनवेलमध्ये आला आहात का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी नकार देत आपण येथे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी आलो असल्याचं सांगितलं. पार्थ पवार यांच्या उमेदवारीबद्दल अजित पवार यांनी आणखी दुजोरा दिलेला नाही. कुणाला कुठुन उमेदवारी द्यायची याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील घेणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार माढा मतदारसंघातून निवडणूक लढणार होते. मात्र एका घरातून किती जणांनी निवडणूक लढवायची, असं म्हणत त्यांनी माढातून माघार घेतली आहे. शिवाय पक्षातून पार्थ पवार यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी होत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तेव्हापासून पार्थ यांची उमेदवारी निश्चित असल्याचं मानलं जात आहे.
VIDEO | पार्थ पवारांच्या विजयासाठी अजितदादा मैदानात | रायगड | एबीपी माझा
भाजपने लक्ष विचलित करण्यासाठी हवाई हल्ला केला
या बैठकीत अजित पवार यांनी सेना-भाजपवर टीका केली. भाजपकडून हवाई हल्ला करुन इतर मुद्द्यावरुन लोकांचं लक्ष विचलित करण्याचं प्रयत्न करण्यात आलं आहे. भाजपा सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली, सिलेंडर महाग झाले, अतिरेकी कारवाया वाढल्या. शिवाय सीमेवर सर्वात जवान शहीद झाले, असा घणाघात त्यांनी यावेळी भाजपवर केला. धनगर समाजाच्या आरक्षणाची कागदपत्रं गायब होतात. संरक्षण खात्यातून फाईल गायब होत आहे. याचाच अर्थ चौकीदार चोर असल्याचं सिद्ध होतं, असा आरोप आजित पवार यांनी केला.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती करणार नाही, स्वबळावर लढणार, अशी घोषणा केली होती. पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या साक्षीने चौकीदार म्हणजेच पंतप्रधान चोर असल्याचंही ते बोलले होते. मात्र परत सत्तेला चिकटले, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांच्यावर आजित पवार यांनी हल्लाबोल केला.