मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी नियामक आणि परीक्षक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांची निवडणुकांच्या कामामधून सुटका झाली आहे. मागील तीन दिवसांपासून विविध शिक्षक संघटना राज्यातील दहावी आणि बारावी बोर्डाचे काम असणाऱ्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावं, यासाठी मागणी करत होते. या मागणीला आज यश आले आहे.


निवडणूक आयोगाचे उपसचिव आणि सह मुख्य निवडणूक अधिकारी ए.एन वळवी यांनी परिपत्रक काढून सर्व जिल्हाधिकारी यांना आदेश दिले आहेत. परीक्षेसाठी नियामक आणि परीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकांना कामातून वगळावे, असे आदेश निवडणूक आयोगाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

दहावी-बारावीचे परीक्षा सध्या सुरु आहे. शिवाय परीक्षा झाल्यावर पेपर तपासण्याचं कामही या शिक्षकांकडे असतं. असं असताना तब्बल 50 हजाराच्या वर शिक्षकांना निवडणुकीचे काम दिले जाणार होते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे आणि विविध शिक्षक संघटनांनी दहावी आणि बारावीचे पेपर तपासणी आणि निकालासंदर्भातील कामात शिक्षक व्यस्त असल्याने निवडणुकीची ड्यूटी देऊ नये, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती.

शिक्षक भारतीने अतिरिक्त शिक्षकांना निवडणुकीचे काम द्यावे आणि इतर शिक्षकांना शाळेच्या परीक्षाचे काम करू द्यावे, अशी मागणी केली होती. मात्र या मागणीबाबत अद्याप विचार झाला नसल्याचं निवडणूक आयोकडून सांगण्यात आलं आहे.

दहावी - बारावीच्या परीक्षांसाठी नियामक व परीक्षक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपल्याने दहावी - बारावीचा निकाल रखडण्याची चिन्हे निर्माण झाली होती. मात्र निवडणूक आयोगाच्या या आदेशामुळे राज्यातील 50 हजाराच्या वर शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.