Ajit Pawar : खासदार गिरीश बापट (Girish bapat) यांच्या रिक्त झालेल्या जागेवर (Ajit pawar) पोटनिवडणूक होणार का? या प्रश्नावर विरोधीपक्षनेते अजित पवार चांगलेच संतापले. गिरीश बापट यांच्या निधनानंतर काँग्रेसकडून निवडणुक लढवणार असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले होते. त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. गिरीश बापट यांचं निधन होऊन तीन दिवसच झाले आहेत आणि सगळे पोटनिवडणुकीचा विचार करत आहे. काही माणूसकी आहे की नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी खडसावलं आहे. लगेच कोणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांनी म्हटले की, गिरीश बापट यांचं निधनं झालं आता लगेच कोणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही. गिरीष बापट यांना जाऊन आज फक्त तिसरा दिवस आहे. इतकी घाई काय आहे. काही माणुसकी प्रकार आहे की नाही. काही महाराष्ट्राची परंपरा आहे की नाही. लोकं म्हणतील यांना थोडी तरी जनाची नाही तर मनाची आहे की नाही?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
कोण नरेश म्हस्के?
कोण नरेश म्हस्के? मी त्यांना ओळखत नाही. असल्या कोणत्याही स्टेटमेंट करणाऱ्यांना मी महत्त्व देत नाही. आम्ही असे घरामध्ये पण वागत नाही. जी माझी भूमिका असते तीच भूमिका ठाम असते. रोहित पवार माझ्या कुटुंबातील एक घटक आहे तो माझा पुतण्या आहे तो मला माझ्या मुलासारखा आहे, असा हल्लाबोल त्यांनी नरेश म्हस्केंवर केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी अजित पवारांवर खळबळजनक आरोप केला होता. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत रोहित पवार यांना पाडा, असं सांगण्यासाठी खुद्द अजित पवार हे अनेकांना फोन करत होते असा दावा म्हस्के यांनी केला होता. 8 जानेवारी 2023 रोजी एमसीएची निवडणूक झाली होती. त्यात रोहित पवार अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्या निवडणुकीवरून म्हस्के यांनी अजित पवारांवर आरोप केले होते. त्यावर अजित पवार यांनी कोण म्हस्के मी ओळखत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
कोयता गँगवर कारवाई करा!
पुण्यातील कोयता गँगची दहशत थांबता थांबत नाही आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था राहायला हवी. कोणी ही असो राजकीय असो किंवा कोणी त्यांच्यवर कारवाई झालीच पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.