मुंबई : दाऊदशी कथित संबंध असणारे रियाज भाटी कोण आहेत हे पवारांना विचारा, असं म्हणत राष्ट्रवादीच्या आरोपांना भाजपनं उत्तर दिलं आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या भाजप कार्यकारिणीचे सदस्य आणि गुंड रियाज भाटी यांच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा का दाखल झाला नाही असा सवाल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी केला होता.


रियाज भाटी यांचे थेट दाऊदशी संधान असल्याचा दावाही मलिक यांनी केला होता. पण उलट शरद पवार यांनीच रियाज भाटी यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका महत्त्वाच्या पदावर घेतलं होतं. त्यामुळे रियाज भाटी कोण हे पवारांना विचारा, असा टोला भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी लगावला आहे.

रियाज भाटी यांनी आशिष शेलारांना एमसीए निवडणूकीत मतं मिळवून देण्यासाठी विल्सन कॉलेजच्या प्राध्यापकांना धमकावल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. पण भंडारी यांनी त्यांचा संबंध थेट पवारांशी जोडून मलिक यांना जोर का झटका दिला आहे.

त्याप्रमाणे भाजपच्या सर्वच नेत्यांशी त्याचे जवळचे संबध आहेत, असा आरोप मलिक यांनी केला होता. मात्र रियाज भाटी याचा भाजपशी अथवा भाजपच्या कोणत्याही नेत्याशी कोणताही संबंध नाही, असा दावा भाजपनं केला आहे.