मुंबई : राजकीय नेत्यांच्या सुरक्षेवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit pawar ) यांनी राज्य सरकारला टोला लागवला आहे. आज अनेक नेत्यांच्या मागे 30-30 सरकारी गाड्यांचा ताफा फिरत आहे. परंतु, खरंच त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा आवश्यक आहे का? असा प्रश्न उपस्थित करत अजित पवार यांनी आपण उपमुख्यमंत्री असताना देखील माझ्या ताफ्यात जास्त गाड्या नको म्हणून सांगत होतो असे सांगितले. याबरोबरच किती लोकांना 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा पुरवली आहे? माहितीच्या अधिकारात याची माहिती मागवली आहे असे अजित पवार यांनी म्हटले आहे. 


अजित पवार यांनी आज माध्यमांसोबत संवाद साधाला. यावेळी त्यांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीवरून राज्य सरकारवर चांलगाच निशाणा साधला. राज्यातील नेतेमंडळींची सुरक्षा काढणं आणि पुरवणं या मुद्द्यावरून देखील अजित पवार यांनी यावेळी सरकारला लक्ष्य केलं. माहिती अधिकारात यासंदर्भातील माहिती मागवल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. मागच्या महिन्यात महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली. तर शिंदे गटाच्या नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. शिंदे गटाच्या 10 खासदार आणि 41 आमदारांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली. यावरून अजित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 


"किती लोकांना 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा पुरवली आहे याची माहिती माहितीच्या अधिकारात मागवली आहे. त्यांना खरंच 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा आवश्यक आहे का? काहींचा तर 30 - 30 सरकारी गाड्यांचा ताफा फिरत आहे. मी उपमुख्यमंत्री असताना जास्त गाड्या असल्या की नको म्हणून सांगत होतो. आपल्याला पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षेसाठीचा पैसा तुमचा नाही. तर तो सरकारकडे टॅक्स रुपाने आलेला आहे. ज्या आमदाराला कोणत्याही पक्षाच्या आमदाराला बंदोबस्त द्यायचा असेल तर जरुर द्या. तो दिलाही पाहिजे, त्यांचे आणि नागरिकांचे संरक्षण करणे, महाराष्ट्रातील शेवटच्या जनतेचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. परंतु सरसकट सगळ्यांना सुरक्षा देण्याची काही गरज आहे? असा प्रश्न यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केला. 


"काही माजी नगरसेवकांना सरकारी संरक्षण दिलं जातंय. कोण त्याला काय करतं?  तो माजी झाला ना?  त्याने गंभीर चुका केल्या असतील तर तो निस्तारेल. त्यासाठी सरकारी यंत्रणांचे संरक्षण देण्याची काय आवश्यकता असा संतप्त सवालही अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला.


दरम्यान, अजित पवार यांनी यावेळी बोलण्याच्या घसरलेल्या पातळीवरून देखील राज्य सरकारला चांगलच सुनावलं. "तुमच्यामध्ये वाचाळवीरांचे मोठं प्रस्थ वाढले आहे. काही मंत्री बोलत आहेत. त्यातून मंत्रिमंडळाची प्रतिमा खराब होत आहे. लोक ऐकून घेत असतात, पाहात असतात, लक्षात ठेवत असतात, काहीजण सहज बोललो म्हणत आहेत. तुम्ही सहज बोलायला नागरिक नाही, तुम्ही राज्याचे प्रतिनिधी आहात, मंत्री आहात, तुम्ही शपथ घेतलेली आहे, तुमच्यावर एक जबाबदारी दिलेली आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारमधील वाचाळवीरांना खडसावले.  


महत्वाच्या बातम्या


Ajit Pawar PC : सत्ताधाऱ्यांमुळे राज्यातील पोलीस तणावाखाली, अधिकाऱ्यांवरही दबाव : अजित पवार