Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना (Jitendra Awhad) विनयभंग प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. आव्हाड यांना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. आव्हाड यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.


ठाणे पोलिसांनी विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. भारतीय दंड विधान 354 नुसार दाखल झालेला गुन्हा हा अजामीनपात्र गुन्हा असतो. अटकेची कारवाई टाळण्यासाठी आव्हाड यांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने  अंतरिम आदेश देताना सुनावणी पूर्ण होईपर्यंत अटक न करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानंतर आज, सकाळी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली.


सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे सांगितले. आरोपी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून तपासात अडथळा निर्माण करू शकतात. त्याशिवाय या प्रकरणाशी संबंधितांवरही दबाव निर्माण करतील. त्यांना जामीन देताना ज्या अटी आणि शर्ती ठेवल्या होत्या. त्याचे पालन त्यांच्याकडून होत नसल्याचेही सरकारी वकिलांनी म्हटले. आव्हाड यांच्या वकिलांनी सरकारी पक्षाच्या युक्तिवादाला प्रत्युत्तर देताना सांगितले की, ठाण्यात मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात खूप गर्दी होती. त्या ठिकाणी धक्काबुक्की झाली असती. त्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आव्हाड प्रयत्न करत होते. आव्हाड यांच्या वकिलांनी कोर्टात त्या घटनेसह तीन व्हिडिओ सादर केले. आव्हाड यांनी त्या महिलेला बाजूला सारण्याआधी दोघांना हटवले होते, ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. शनिवारी मंजूर केलेल्या जामिनात कोर्टाने अटी घातल्या होत्या. कुठल्याही अटींच उल्लंघन झालं नसल्याचे आव्हाड यांच्या वकिलांनी सांगितले. त्या महिलेला कुठल्याही हेतूने स्पर्श न करता बाजूला काढलं आहे. केवळ स्पर्श केला म्हणून भादंवि 354 लागू होत नाही, असेही वकिलांनी म्हटले.  


जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाण्यात याचे राजकीय पडसाद उमटले होते. आव्हाड यांनी दाखल झालेल्या या गुन्ह्याविरोधात आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंब्रा-कळवा परिसरात आंदोलन केले होते. आव्हाड यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा हा राजकीय सूडबुद्धीने दाखल केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आला. आव्हाड यांना कोणताही गुन्हा केला नसल्याचे सांगताना त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी कारवाईवर प्रश्न उपस्थित केले होते. 


पाहा व्हिडिओ: जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व विनयभंग प्रकरणी जामीन मंजूर 



इतर महत्त्वाच्या बातम्या: