Eknath Khadse : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे भाजपच्या तीस नगरसेवकासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला तसेच राष्ट्रवादीमध्ये यानंतरही अनेक नेते प्रवेश करणार असल्याचं वक्तव्य केलं. हा फक्त ट्रेलर आहे, अजून अनेकजण राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत, असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या मेळाव्यात केलं आहे. यावेळी बोलताना खडसे म्हणाले की, माझ्या पक्षप्रवेशानंतर अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. पुढील काळात अजूनही अनेकजण राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. आज हे त्याचं फक्त ट्रेलर आहे, असं वक्तव्य खडसे यांनी केलं. एकनाथ खडसेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय क्षेत्रात चर्चेचा उधाण आलेय.
खडसे म्हणाले की, 'ज्या पक्षाला मोठे करण्यासाठी आपण मेहनत घेतली, तो पक्ष खडसे यांना झाला नाही तो आपल्याला काय होणार? अशी भावना भाजप कार्यकर्त्यांच्यामध्ये आहे. मी राष्ट्रवादी पक्षात आल्यावर अनेकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. पुढील काळात आणखी काही जण राष्ट्रवादी पक्षाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे अजित दादा तुम्हाला यापुढेही जळगावला यावं लागेल.' यावेळी बोलताना खडसे यांनी भाजप आमदार संजय सावकारे ही आमचेच असल्याचं सांगितलं. त्यामुळे संजय सावकारे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
भुसावळ नगर पालिकेच्या विविध विकास कामाचे लोकार्पण सोहळ्यातील भाषणात बोलताना एकनाथ खडसे यांनी आमदार सावकारे यांनी रस्त्याच्या कामाला तीन कोटी रुपयांचा निधी दिल्याचे सांगितलं. तसेच तुम्ही आमचेच आहात असे सांगितलं. खडसेंच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. यावेळी खडसे यांनी आपलं वाक्य दुरुस्त करीत भुसावळ शहराचे असल्याचं सांगितलं. तरीही खडसे यांना काय सांगायचं होत ते सगळ्यांना समजलं.
अजित पवार काय म्हणाले?
भुसावळ येथील राष्ट्रवादी मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले की, 'जळगाव जिल्हा सोन्यासाठी प्रसिद्ध आहे, मात्र काही जणांना सोन्याची किंमत कळली नाही. मात्र राष्ट्रवादीला ती कळली. खडसे यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने जळगाव जिल्हा हा आधीप्रमाणे पुन्हा एकदा राष्ट्रवादीमय होण्यास वेळ लागणार नाही.' खडसे यांनी ज्या पक्षाला लहानाचे मोठे केले, त्याच पक्षाने त्यांचा अपमान केला. खडसेंवर खोटे आरोप लावण्यात आले. ज्यांनी त्या पक्षाला मोठे केले त्याच एकनाथ खडसे यांना त्यांचा पक्ष झाला नाही, तो आपल्याल काय होणार? अशी सर्व सामान्य कार्यकर्त्यांमध्ये भावना असल्यानेच अनेक कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे, असे अजित पवार म्हणाले.