मुंबई: अजित पवारांनी भाजप-शिंदेंसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली...राष्ट्रवादीवर दावाही केला, दुसरीकडे सुप्रिया सुळे यांची फोनाफोनी सुरू... तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतरच्या पहिल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांच्या बाजूला आमदार रोहित पवार... हे चित्र आहे सध्याच्या राष्ट्रवादीचं. अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर केवळ राष्ट्रवादीतच फूट पडली नसून थेट पवार घराण्यात फूट पडल्याचं स्पष्ट झालंय. या फुटीमध्ये एकीकडे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार तर दुसरीकडे अजित पवार असं चित्र आहे. 


गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा होती. ती आज प्रत्यक्षात आली. अजित पवारांनी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे चाळीसच्या आसपास आमदार असल्याचा दावा केला असून आपण म्हणजे राष्ट्रवादी असा एक संदेश दिल्याचं सांगितलं जातंय. अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचं सांगितलं आहे. तर दुसरीकडे आपणच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलंय. या सर्व घडामोडींमध्ये सुप्रिया सुळे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 


रोहित पवार शरद पवारांच्या बाजूला


राष्ट्रवादीतील फुटीनंतर राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांच्या बाजूला आमदार रोहित पवारांची उपस्थिती सर्व काही सांगून जात होती. 2019 साली झालेल्या पहाटेच्या शपथविधीवेळीही रोहित पवारांनी ट्वीट करत आपण शरद पवारांसोबत असल्याचं स्पष्ट केलं होतं. तर आताही त्यांनी शरद पवारांच्या बाजूला राहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 


दुसरीकडे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. काहीच दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यांच्यासोबतचे दुसरे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे अजित पवारांसोबत असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील या फुटीनने आता थेट पवारांच्या घरात फूट पडल्याचं दिसून येतंय.


Rohit Pawar Tweet On Sharad Pawar रोहित पवारांनी शेअर केला शरद पवारांचा व्हिडीओ


राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी आपण शरद पवारांच्या पाठिशी असल्याचं स्पष्ट केलं आहे. रोहित पवारांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. शरद पवारांच्या राजकीय संघर्षाची कथा असणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 


ही बातमी वाचा: