मुंबई : निवडणूक आयोगाने (Election Comission) दिलेल्या निकालामुळे शरद पवारांच्या (Sharad Pawar) हातून पक्ष आणि चिन्ह निसटलं आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) गटाकडे देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला आहे. यावर शरद पवार गटाचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांची यासंदर्भात प्रतिक्रिया समोर आलीये. पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबतच असल्याचं रोहित पवारांनी त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलं.
रोहित पवारांनी ट्वीट करत ही प्रतिक्रिया दिली आहे. तसेच सत्तेचा गैरवापर करुन हा निर्णय घेण्यात आल्याचं देखील यावेळी रोहित पवारांनी म्हटलं. त्यामुळे आता यावर शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. निवडणूक आयोगाने जो न्याय शिवसनेला दिला तोच न्याय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या बाबतीत दिला आहे. त्यामुळे शरद पवार गटाकडून तीव्र नाराजी देखील व्यक्त केली जात आहे.
रोहित पवारांनी काय म्हटलं?
रोहित पवारांनी ट्वीट करत म्हटलं की, केंद्रातील महाशक्तीच्या बेलगाम सत्तेचा गैरवापर करुन फुटीर गट व्यक्तीगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा असंवैधानिक निर्णय घेऊ शकतो.… परंतु आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर वाढवणं, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणं, मंबईचं महत्त्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणं, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं, राज्यातील हक्काचे प्रकल्प राज्यातच टिकवून ठेवणं, असे महाराष्ट्राच्या हिताचे कायदेशीर निर्णय केंद्रातील महाशक्तीचा वापर करुन सामान्य लोकांच्या हितासाठी मात्र त्यांना घेता येत नाहीत, यातच त्यांची लायकी कळते. आज सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे!
अजित पवारांसोबत किती आमदार?
- महाराष्ट्रातील 41आमदार
- नागालँडमधील 7 आमदार
- झारखंड 1 आमदार
- लोकसभा खासदार 2
- महाराष्ट्र विधानपरिषद 5
- राज्यसभा 1
शरद पवारांसोबत किती आमदार?
महाराष्ट्रातील आमदार 15
केरळमधील आमदार 1
लोकसभा खासदार 4
महाराष्ट्र विधानपरिषद 4
राज्यसभा - 3