मुंबई : निवडणूक आयोगाने (Election Comission) राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे (Ajit Pawar) दिल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीये. अजित पवारांनी ट्वीट करत ही प्रतिक्रिया दिलीये. निवडणूक आयोगाचा निर्णय आम्ही विनम्रपणे स्विकारतो, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर अजित पवारांची त्यांनी सत्ताधारी पक्षांसोबत जाण्याची भूमिका घेतली. त्यानंतर त्यांच्याकडून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर देखील दावा करण्यात आला होता. निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची लढाई सुरु होती. पण आता अजित पवारांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत करत स्वत:चा राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख देखील केला आहे. 


 






शिंदे गटाचा न्याय दादांच्या राष्ट्रवादीला


राष्ट्रवादीच्या आधी शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद हा निवडणूक आयोगासमोर होता. त्यावेळी आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाचं असल्याचं सांगत तेच खरी शिवसेना असल्याचं स्पष्ट केलं. शिवसेनेत ज्या काही घडामोडी घडल्या त्याच पद्धतीने घडामोडी या नंतरच्या राष्ट्रवादीमध्ये घडल्या. अजित पवारांनी भाजपला साथ दिल्यानंतर बहुतांश आमदार हे त्यांच्यासोबत गेले आणि राष्ट्रवादीचा वाद हा निवडणूक आयोगामध्ये पोहोचला.


शरद पवार गटाला नवं चिन्ह आणि नाव निवडावं लागणार


निवडणूक आयोगाने हा निकाल दिल्यानंतर शरद पवारांकडे दोन पर्याय आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयावर शरद पवार सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात किंवा आता शरद पवारांना पक्षासाठी नवं नाव आणि चिन्ह शोधावं लागणार आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या निकालावर आता शरद पवार काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


अजित पवारांसोबत किती आमदार? 


- महाराष्ट्रातील 41आमदार 
- नागालँडमधील 7 आमदार 
- झारखंड 1 आमदार 
- लोकसभा खासदार 2
- महाराष्ट्र विधानपरिषद 5 
- राज्यसभा 1 


शरद पवारांसोबत किती आमदार? 


महाराष्ट्रातील आमदार 15 
केरळमधील आमदार 1
लोकसभा खासदार 4 
महाराष्ट्र विधानपरिषद 4
राज्यसभा - 3


पाच आमदारांनी व एका खासदाराने दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.  


निवडणूक आयोगाच्या या निकालावर आता शरद पवार गट काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


ही बातमी वाचा : 


दबावामुळे निवडणूक आयोगाचा हा निर्णय, अनिल देशमुखांचा वार, निवडणूक आयोगाचा निर्णय योग्यच : सुनील तटकरे