मुंबई : आगामी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आघाडी केली आहे. मुंबईत झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय झाला. ठाण्यातील जागेसाठी राष्ट्रवादीचे वसंत डावखरे रिंगणात उतरले आहेत.


 
राष्ट्रवादी काँग्रेसकडून डावखरे चार वेळा ठाणे मतदारसंघातून निवडून आले होते. विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांचा कार्यकाळ 8 तारखेला संपणार आहे. वसंत डावखरे उद्या ठाण्यात 11 वाजता अर्ज दाखल करणार आहेत.

 
विधानपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे उपस्थित होते.

 
ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेच्या जागेसाठी 3 जूनला मतदान होणार आहे, तर 6 जून रोजी मतमोजणी होईल.