सोलापूर: सोलापुरातल्या हायप्रोफाईल मर्डर केसमधून पोलिसांना नवनवीन आणि धक्कादायक माहिती मिळत चालली आहे. व्यवसायाने डॉक्टर असलेला प्रसन्न रंगेल तर होताच, पण तो किती निर्दयी होता याची प्रचीती पोलिसांना आली.

 

जीवापाड प्रेम करणाऱ्या पत्नीचा खून करणाऱ्या प्रसन्नाला त्याच्या मुलाच्या भवितव्याचीही चिंता वाटली नाही. हा सगळा प्रकार प्रसन्नची प्रेयसी मेघ रॉय चौधरीच्या साक्षीने झाल्याचं पोलीस तपासात उघड होत चाललं आहे.

 

डॉ. रश्मी अग्रहारचा खून होण्याच्या काळात मेघ रॉय चौधरी सोलापूर मुक्कामी असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे रश्मी अग्रहार खून खटल्यात प्रसन्नाचा हात खोलवर अडकत चालला आहे.
कर्नाटकची राजधानी बंगळुरूची रश्मी पुजार,  लग्नानंतर रश्मी अग्रहार बनली. २०११ साली तीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. दुर्दैवाने हे बाळ ऑटीझमच्या आजाराने त्रस्त होतं. डॉक्टर प्रसन्न अग्रहार दिवसभर गंगामाई हॉस्पिटलमध्ये व्यस्त असल्याने रश्मी पूर्ण वेळ मुलाची देखभाल करायची. नवरा आणि मुलासाठी रश्मीने आपल्या वैद्यकीय व्यवसायाकडे दुर्लक्ष केलं.एक  व्यवसायिक डॉक्टर कुटुंबवत्सल गृहिणी बनली होती. पण प्रसन्न मात्र आपली प्रेयसी मेघ रॉय चौधरी सोबत व्यस्त असायचा. रश्मीचा संशयास्पद मृत्यू झाला तेव्हा ती सोलापूर वास्तव्यास होती.

 

रश्मी घरची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत असताना प्रसन्न मात्र मेघ रॉयसोबत देशभर भ्रमंती करायचा. रश्मी माहेरी गेल्यावर मेघ रॉय सोलापुरातल्या प्रसन्न यांच्या घरातच वास्तव्याला असायची. दोघांच्या अनैतिक संबंधाची कहाणी रश्मीला समजली. अंतर्गत कलह सुरु झाले. रश्मीचा वाढता विरोध रोखण्यासाठी प्रसन्न आणि मेघ रॉय यांनी रश्मीच्या खुनाचा कट रचला. जवळपास हा खून खटला आरोपींनी पचवलाच होता. अखेर १० महिन्यांनी सोलापूर पोलिसांनी या हायप्रोफाईल खून खटल्याचा पर्दाफाश केला.

९ जुलै २०१५ रोजी रात्री साडे बारा वाजता अचानक रश्मीचा मृत्यू झाला. आपल्या सहकारी डॉक्टरांना पाचारण करून प्रसन्नाने रश्मीला गंगामाई रुग्णालयात दाखल केल. हृदयविकाराने मृत्यू झाल्याच जाहीर करून अंत्यसंस्कार केले. डॉक्टर प्रसन्न अग्रहार सोबत गंगामाईचे प्रमुख डॉक्टर एस. प्रभाकर, डॉक्टर भाऊसाहेब गायकवाड आणि डॉक्टर अमित कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल झाला.  त्यातील तिघांना सोलापूर सत्र न्यायालयाने काल अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

पोलिसांनी प्रसन्नाला ८ एप्रिल रोजी चौकशीसाठी पाचारण केलं. पण प्रसन्नाने चौकशीला सामोरं न जाता थेट न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली.  सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यावर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयात त्याच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे. सोलापूर गुन्हे शाखेची विशेष पथके त्याच्या अटकेसाठी प्रयत्नशील आहेत.  पोलिसांची पथके कर्नाटक आणि पश्चिम बंगालला रवाना झाली आहेत. प्रसन्ना जेव्हा पोलिसांच्या हाती लागेल तेव्हाच या गूढ खुनाला वाचा फुटेल.



 

संबंधित बातम्या


विवाहित डॉक्टरचं प्रेमप्रकरण, पत्नीची हत्या, 4 डॉक्टरांवर गुन्हा