MLC Election 2022 : विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतमध्येच अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मतांसाठी पळवापळवी सुरु झाल्याचं समोर आलं आहे. अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने वेगवेगळा संपर्क साधला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील असमन्वयाची चर्चा जोरदार रंगली आहे. येत्या 20 जून रोजी विधानपरिषद निवडणूक होणार आहे. 10 जागांसाठी 20 उमेदवार रिंगणार आहेत.


मागील काही दिवसातील भेटीगाठी पाहता बहुजन विकास आघाडीची तीन मतं आपल्या परड्यात पाडून घेण्यासाठी सर्वच उमेदवार हितेंद्र ठाकूर यांना संपर्क साधत आहेत. महाविकास आघाडीतील महत्त्वाचे आणि चर्चेत असलेले दोन उमेदवार म्हणजे काँग्रेसचे भाई जगताप आणि राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर. हे दोन्ही उमेदवार स्वत: बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत दोन ते तीन तास चर्चा केल्याचं समजतं.


विधानपरिषद निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे. अपक्ष आमदार किंवा इतर पक्षाचे आमदार गळाला लावून आपली जागा सुरक्षित करण्यासाठी अशाप्रकारचे प्रयत्न होत असल्याची माहिती मिळत आहे. या निवडणुकीत 13 अपक्ष आमदार आहेत तर छोट्या पक्षांचे जवळपास 16 आमदार आहेत. या सगळ्यांना आपल्या बाजूने कसं वळवता येईल यासाठी महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीचे नेते बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांना भेटल्यानंतर भाजपनेही मनिषा चौधरी यांना हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीसाठी पाठवलं होतं. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी जी तीन मतं महत्त्वपूर्ण ठरली होती ती पुन्हा एकदा आपल्याच पारड्यात पडावी यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.


शिवसेनेला पाठिंबा देणारे नरेंद्र भोंडेवार, गीता जैन, राजेंद्र पाटील यड्रावकर यांची मतं मिळवण्यासाठी सर्व उमेदवार त्यांच्याशी संपर्क करत असल्याचं दिसत आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख उमेदवार एकनाथ खडसे, रामराजे नाईक निंबाळकर, भाई जगताप, चंद्रकांत हांडोरे हे या आमदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे हे अपक्ष आमदार कोणाला मत देणार याची उत्सुकता आहे. 


राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधानपरिषद निवडणुकीतही क्रॉस व्होटिंगची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या निवडणुकीत आमदारांनी आपल्या उमेदवारांना मतदान करावं, यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे, ही मतं आपल्याकडेच राहतील का हा प्रश्न सर्व पक्षांसमोर आहे. 


विधानपरिषदेवर निवडून येण्याचे गणित काय?


- विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची 27 मतांची आवश्यकता आहे. 


- राज्यसभेप्रमाणे मतदान झालं तर भाजपकडे सध्या 123 संख्याबळ आहे.


- त्यामुळे भाजपच्या 4 जागा सहज निवडून येऊ शकतात.


- पाचव्या उमेदवारासाठी भाजपला 12 मतं कमी पडतात


- महाविकास आघाडीकडे 161 संख्याबळ आहे.


- त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आमदार विधानपरिषदेत जातील. 


- तर मित्र पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने काँग्रेसच्या वाट्यालाही दोन जागा येऊ शकतात.


संबंधित बातम्या


MLC Election 2022 : विधानपरिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या हालचाली; शिवसेना, राष्ट्रवादीने आमदारांना मुंबईत बोलावलं!


MLC Election 2022 : बविआच्या तीन मतांसाठी नेत्यांची विरारवारी; हितेंद्र ठाकूरांची काँग्रेस-भाजप नेत्यांकडून भेटीगाठी