MLC Election 2022 : येत्या विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपने कंबर कसली आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात असून 20 जून रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेच्या निवडणुकीत लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांचे महत्त्व वाढले आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपने सरशी केली असल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. तर, या पराभवाची परतफेड करण्यासाठी महाविकास आघाडीकडून रणनिती आखली जात आहे. त्याच  अनुषंगाने बहुजन विकास आघाडीची मते आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी उमेदवारांची विरारवारी सुरू झाली आहे. बविआकडे तीन आमदार असून निर्णायक ठरणार आहेत.


राज्यसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मते फुटली नाहीत. तर अपक्ष आणि लहान पक्षांनी कोणाच्या पारड्यात मतदान केले याचे आखाडे अजूनही बांधले जात आहेत. त्यातच विधान परिषदेची निवडणूक ही गुप्त मतदानाने पार पाडली जाते. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप कोणतीही जोखीम घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. विधानसभेतील लहान पक्ष आणि अपक्षांना वळवण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न सुरू आहेत. 


बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत. या तीन आमदारांची मते निर्णायक ठरणार आहेत. काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर देखील हितेंद्र ठाकूर यांची भेट घेणार आहेत.


आतापर्यंत काँग्रेसचे भाई जगताप, भाजपच्या मनीषा चौधरी आणि राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे पाटील यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आहे. बहुजन विकास आघाडीकडे हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर व राजेश पाटील अशी तीन मते आहेत. या तीन मतांसाठी हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा सुरू आहे. हितेंद्र ठाकूर राज्यसभा निवडणुकीप्रमाणे आपले पत्ते लपवून ठेवणार की उघड करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 


विधानपरिषदेवर निवडून येण्याचे गणित काय?


- विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची 27 मतांची आवश्यकता आहे. 


- राज्यसभेप्रमाणे मतदान झालं तर भाजपकडे सध्या 123 संख्याबळ आहे.


- त्यामुळे भाजपच्या 4 जागा सहज निवडून येऊ शकतात.


- पाचव्या उमेदवारासाठी भाजपला 12 मतं कमी पडतात


- महाविकास आघाडीकडे 161 संख्याबळ आहे.


- त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आमदार विधानपरिषदेत जातील. 


- तर मित्र पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने काँग्रेसच्या वाट्यालाही दोन जागा येऊ शकतात.