Ajit Pawar :  आता नाय चुकायचं, आता नाय चुकायचं. बाबांनो मी लय खबरदारी घेतोय. एकदाच चुकलोय, ती चुक चांगलीच भोवलीये. त्यावेळी यशवंतराव चव्हाणांच्या समाधीसमोर दिवसभर बसलो. आता चुकायचं नाही. तेंव्हापासून बोलताना चुकलो नाही. (मग टाळ्यांचा कडकडाट झाला) तुम्ही टाळ्या वाजवून कितीही कौतुक करा. तरीही मी चुकणार नाही. नाहीतर कसं होत, कार्यकर्त्यांनी कौतुक केलं की भावनांच्या भरात नेते चुकीचं बोलून जातात. माझ्याबाबत असं झालं की मी माझ्या आतल्या दुसऱ्या मनाला म्हणतो, बोलताना चुकायचं नाय... चुकायचं नाय.... चुकायचं नाय, असे अजित पवार म्हणाले. ते पिंपरी चिंचवड येथे कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.

  


अजित पवार म्हणून सकाळी लवकर येतात?
आज मी अर्धा तास आधी आलो. याबाबत मी आयुक्त राजेश पाटलांनाही सांगितलं नव्हतं. पण तो बाबा माझ्या आधी अर्धा तास येऊन थांबला होता. कारण त्यांना माहितेय मी लवकरच येतो. लवकर येण्यामागचा हेतू शुद्ध असतो. मला जे अपेक्षित असतात त्याच व्यक्ती उपलब्ध होतात. गर्दी होत नाही, लवकर येऊन लवकर गेलो की रस्ते मोकळे होतात. माझ्यामुळं वाहतूक कोंडी झालेली ही मला आवडत नाही.


 कार्यकर्त्यांनी मनात राष्ट्रवादी रुजवावी
घराघरात राष्ट्रवादी पोहचवा. पण त्या आधी कार्यकर्त्याने त्याच्या मनात भिनवायला हवी. नाहीतर कार्यकर्ताच द्विधा मनस्थितीत असायचा, मग लोक म्हणतील ह्याचंच ठरेना अन् हा मला सांगतोय.


 महापालिका निवडणूक महाआघाडीचं काय?
महाविकासआघाडी करायची तयारी आहे. व्यवहाराने मागणी करावी, अव्वाच्या सव्वा मागणी करू नका. असं झालं तर नाईलाजास्तव मला एकला चलो रे चा नारा द्यावा लागेल. माझी तशी सध्या अजिबात इच्छा नाही. माझी आत्ता आघाडीचीच मानसिकता आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलेय. 



...तर पदच काढून घेतो -
आता पद वाटप करतोय. पण त्यातील कोणाला तिकीट मिळेल अथवा मिळणारही नाही. मिळालं नाही म्हणून मी आता पक्षाचं काम करणार नाही. असे कुणी करणार असेल तर मग मी दिलेलं पदच काढून घेतो, असा सज्जड दम अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलाय.


कार्यकर्तेहो तुम्ही भरकटू नका -
काही संघटना जातीच्या धर्माच्या नावाने विष कालावण्याचा प्रयत्न करतायेत. शरद पवार साहेबांच्या घरावर हल्ला झाला. कोण आहेत त्या शक्ती? कोणाचा हात त्यामागे आहे? पुण्यात ही महिला कार्यकर्तीला मारहाण कर, हे योग्य नाही. आपण ही असलं काही करू नये. कायदा हातात घेऊ नये. लोकशाही मार्गाने तुम्ही ते करू शकता.


हनुमान चालीसावर काय म्हणाले?
मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणणार. अरे का रे बाबा. तु तुझ्या घरी जाऊन कर ना. आता मी पिंपरीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेंच्या भोसरीतल्या घरासमोर काही करावं का? नाही, मी तिकडे काटेवाडीच्या, बारामतीच्या किंवा मुंबईतल्या घरासमोर ते करायला हवं. कोणतीही कृती करताना दुसऱ्यांना का त्रास द्यावा. तुमच्या भावनांचा मी आदर करतो पण कोणी स्वतःहून अनादर करून घेऊ नका. हे जे काही सुरु आहे, त्यातून तुम्ही कार्यकर्ते भरकटू नका. आपलं समाजकारण ठरलंय तेच करा. समाजात तेढ निर्माण होईल असं कृत्य करू नका.