शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादीचं राज्यभरात आंदोलन
एबीपी माझा वेब टीम | 07 Jun 2016 10:28 AM (IST)
अकोला/औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवरुन सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विविध जिल्ह्यात सरकारविरोधात आंदोलनं केली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने जालन्यातील भोकदरन परिसरात आज मोर्चा काढला. यावेळी सुप्रीया सुळेंनी सरकारच्या शेतकरी धोरणांवर जोरदार टीका केली. राज्यात शेतकरी संकटात असताना सरकारला लाल दिवा महत्वाचा वाटतो. शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार गंभीर दिसत नाही. त्यामुळे आगामी काळात कर्जमाफी झाली नाही तर आपण तीव्र आंदोलन करणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं. तर तिकडे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी औरंगाबादच्या खुलताबादेत आंदोलन केलं. बीडमध्ये डॉ. भारतभूषण क्षीरसागर, धनंजय मुंडे परळीत मोर्चा काढला.