मुंबई : वाढत्या प्रदुषणामुळे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतो, याबाबत सर्वसामान्यांना माहिती असतेच. मात्र नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणाने तुमच्या-आमच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे. प्रदूषणामुळे आपलं आयुष्यमान कमी होत असल्याची माहिती आहे.


 
राज्यातील शहरांना प्रदूषणाने घातलेला विळखा आपलं आयुष्य कमी करत असल्याचं ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी डिपार्टमेंटने केलेल्या सर्वेक्षणात समोर आलं आहे. प्रदूषणामुळे राज्यात नागरिकांचं वयोमान साडेतीन वर्षांनी कमी होत असल्याचं म्हटलं आहे.

 
प्रदूषणामुळे मृत्यूमुखी पावलेल्या नागरिकांच्या एकूण संख्येपैकी 10 टक्के मृत्यू हे महाराष्ट्रात झाल्याचं आकडेवारी सांगते. त्यामुळे हा प्रश्न किती गंभीर होत चालला आहे, हे दिसून येत आहे.

 
या सर्वेक्षणात प्रदूषणाची समस्या गंभीर असलेल्या राज्यांपैकी पहिल्या स्थानावर उत्तर प्रदेश (15 टक्के) तर महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे येत्या काही काळात वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्याचं मोठं आव्हान सर्वांसमोर असणार आहे.